Join us

पालिका विद्यार्थ्यांसाठीच्या मास्क खरेदीला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 4:06 AM

मुंबई : शाळा सुरू होण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने मास्क खरेदी करण्याची तयारी सुरू केली होती. या प्रस्तावाला नगरसेवकांकडून विरोध केला ...

मुंबई : शाळा सुरू होण्यापूर्वीच पालिका प्रशासनाने मास्क खरेदी करण्याची तयारी सुरू केली होती. या प्रस्तावाला नगरसेवकांकडून विरोध केला जात होता. अखेर विद्यार्थ्यांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मास्कच्या निविदा स्थगित करण्यात आल्या आहेत. शाळा सुरू करण्याचा सध्यातरी कोणताही निर्णय नसल्याने मास्कची खरेदी पुढे ढकलल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यानंतर मार्च महिन्यापासूनच पालिकेच्या शाळाही बंद ठेवण्यात आल्या. मात्र राज्य सरकारने २७ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे जाहीर केले तरी अद्याप मुंबई महापालिकेने आपल्या शाळांबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे २० कोटींचे मास्क खरेदीची घाई कशाला, असा सवाल नगरसेवकांकडून केला जात आहे. तसेच मास्क खरेदीबाबतची सद्य:स्थिती सादर करण्याची मागणी भाजपने केली होती.

त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरच विद्यार्थ्यांसाठी मास्क खरेदी करण्यात येईल. यासाठी नऊ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने शिक्षण समितीला दिली आहे. या निविदेवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही कंपनीची निवड करून त्यांना कार्यादेश दिलेला नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत अस्पष्टता

शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे का? विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत वैद्यकीय तज्ज्ञांची मते घेतली आहेत का? शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार का? त्याबाबत महापालिका प्रशासनाने कोणती पूर्वतयारी केली आहे, असे प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले आहेत.

मास्कचा वापर

एक मास्क ३० वेळा धुऊन वापरता येणार असल्याने, शैक्षणिक वर्षात किमान १० मास्कची आवश्यकता आहे. पण या मुलांना प्रत्येकी २५ मास्क दिले जाणार आहेत. म्हणजे पुढील दोन वर्षांचे मास्क आताच खरेदी करून, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे नगरसेवकांकडून विरोध केला जात होता.