एसटीच्या ३११६ उमेदवारांच्या प्रशिक्षणावरील स्थगिती उठवली - परिवहनमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:01+5:302021-02-16T04:08:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर व उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने सन २०१६-१७ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर व उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने सन २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे ३११६ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. या सर्व उमेदवारांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर खंडित झाले होते, तेथून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने सन २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे ३११६ प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. यामध्ये २८४६ पुरुष, चालक तथा वाहक, १६१ महिला, चालक तथा वाहक, २ पर्यवेक्षक व १०७ अधिकाऱ्यांचा समावेश होता. सद्य:स्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते त्या टप्प्यापासून पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एसटीचे महाव्यवस्थापक (कर्मचारी वर्ग) माधव काळे यांनी यासंदर्भातील परिपत्रक संबंधित विभागांना जारी केले.
..................................................