Join us

संभाव्य कचरा कराला कॉंग्रेसचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:36 AM

कचरा उचलणे, त्याची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली मुंबईकरांवर दरमहिना ६० रूपये अतिरिक्त कर आकारण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला काँग्रेस तीव्र विरोध करेल.

मुंबई : गृहनिर्माण सोसायट्या आणि घरातील कचरा उचलणे, त्याची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली मुंबईकरांवर दरमहिना ६० रूपये अतिरिक्त कर आकारण्याच्या कोणत्याही प्रस्तावाला काँग्रेस तीव्र विरोध करेल. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली मुंबईकरांवर नवा भुर्दंड सहन करणार नसल्याचा इशारा मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी दिला.कचऱ्यावर मुंबई महापालिका सध्या कोणताही कर आकारत नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात मुंबई महापालिकेचे मानांकन घसरले होते. हे मानांकन टिकविण्यासाठी हा कर लावण्याचा विचार पालिका स्तरावर सुरू आहे. याबाबत अभ्यास सुरू असून तसा निर्णय झाल्यास पालिकेकडून त्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. कचरा कर लावण्याच्या पालिकेतील प्रयत्नांना काँग्रेसचा तीव्र विरोध असणार असल्याचे सप्रा यांनी स्पष्ट केले. मालमत्ता कर, पाणीपट्टी अथवा अन्य करांप्रमाणे हा अधिभार लावला जाण्याची शक्यता आहे. प्रतिमहिना ६० रूपये ही मुंबईकरांची लूट आहे. स्वच्छ सर्वेक्षण रँकिंगच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक सुरू आहे. शिवाय, आशियातील श्रीमंत अशी मुंबई पालिका आता भ्रष्टाचाराचे प्रतिक बनली आहे. कच-याची विल्हेवाट लावणे ही पालिकेची प्रथमिक जबाबदारी आहे. आता अचानक स्वच्छतेच्या नावाखाली लूट करण्याची आवश्यकता नाही, असे सप्रा म्हणाले.मुंबईत डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न गंभीर झाला आहे. पालिकेला त्यावर उपाय शोधता आला नाही. मुंबईकरांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात अपयशी ठरलेली मनपा फक्त लुबाडत आहे. पार्किंगच्या नावाखाली सध्या लूट सुरूच आहे. एकीकडे डम्पिंग ग्राऊंडची समस्या मनपा सोडवत नाही आणि दुसरीकडे स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला आमचा कडाडून विरोध असल्याचे सप्रा म्हणाले.