मुंबईतील खड्ड्यांचे विघ्न कायम; महापालिका म्हणते ९२ टक्के खड्डे भरून दाखविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:39 AM2018-08-03T02:39:37+5:302018-08-03T02:39:43+5:30
पावसाळा सुरू होऊन जून आणि जुलै असे दोन महिने लोटले तरी प्रत्यक्षात मुंबई पालिकेला मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यात यश आलेले नाही.
मुंबई : पावसाळा सुरू होऊन जून आणि जुलै असे दोन महिने लोटले तरी प्रत्यक्षात मुंबई पालिकेला मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यात यश आलेले नाही. मात्र, दाखल १ हजार ६६० तक्रारींपैकी १ हजार ५३० तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. याचाच अर्थ ९२.१६ टक्के भरून दाखवल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात दाखल तक्रारी वगळता छोट्या-मोठ्या रस्त्यांवरील खड्डे जैसे थे असल्याचे चित्र आहे.
मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण २४ वॉर्डमधून खड्ड्यांच्या १ हजार ६६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १ हजार ५३० तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे, तर १३० खड्ड्यांच्या तक्रारी सोडविण्यात आलेल्या नाहीत. टक्केवारीत विचार करता ९२.१७ टक्के तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून प्रलंबित खड्ड्यांच्या तक्रारींचा विचार करता हे प्रमाण ७.८४ टक्के आहे.
वॉर्डच्या विभागवारीनुसार, पी/नॉर्थमधून १५५, के/पूर्व १८८, के/पश्चिम १३७, एच/पूर्व ११८ अशा खड्ड्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याखालोखाल एच/पश्चिम, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम, एन, पी/दक्षिण, आर/मध्य, आर/दक्षिण, एस आणि टी वॉर्डमधून खड्ड्यांच्या पन्नासहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. येथील अर्ध्याअधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे सी, डी, के/पश्चिम आणि टी विभागातील खड्ड्यांच्या तक्रारींचा शंभर टक्के निपटारा करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
पूर्व उपनगराचा विचार करता लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, कुर्ला डेपो सिग्नल, कल्पना सिनेमा, प्रिमियर सिग्नल, कमानी जंक्शन येथे खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे.
कुर्ला पश्चिमेकडील कमानी जंक्शनपासून अंधेरी पश्चिमेकडील साकीनाका जंक्शन आणि मरोळपर्यंतचा विचार करता बैलबाजार पोलीस चौकी, जरीमरी, मरोळ नाका येथेही मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. परिणामी, अंधेरीकडे आणि कुर्ला स्थानकासह घाटकोपर आणि पवईकडे प्रवास करताना मुंबईकरांना खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे.
सांताक्रुझ परिसराचा विचार करता कालिना रोड आणि सांताक्रुझ स्थानकाकडील रस्त्यांवर खड्डे असून, वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडत असलेल्या कालिना म्हणजे मिठी नदीच्या पुलावरील खड्डे अद्यापही भरण्यात आलेले नाहीत.
वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील खेरवाडीसह लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर खड्डे असून, सध्या पडत असलेल्या पावसाचे पाणी खड्ड्यांतच साचते. परिणामी, वाहनचालकांसह मुंबईकरांना त्रास होतो.
- मुंबई शहरात पी.डीमेलो रस्त्यावर, मोहम्मद अली रोडवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरही जंक्शन आण सिग्नल परिसरातील भागात खड्डे कायम आहेत.
- बोरीवली पूर्वेकडील टाटा पॉवर येथेही खड्ड्यांचे प्रमाण कायम आहे.
1) खड्डेमुक्तीसाठी महापालिकेने तीन वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. परिणामी, ‘झीरो टॉलरन्स फॉर पॉटहोल’ (खड्डेमुक्त मोहीम) प्रशासनाने आखली आहे.
2) मुंबईत दरवर्षी सरासरी चारशे किलोमीटर रस्त्यांचे खोदकाम विविध कंपन्या केबल, नव्या वाहिन्या अथवा दुरुस्तीसाठी करीत असतात. मात्र, त्या ठिकाणी सुरक्षेची
खबरदारी घेण्यात येत नसयल्याचे चित्र
पाहायला मिळते.
रस्त्याच्या तक्रारीसाठी
टोल फ्री क्रमांक :
१८००२२१२९३
खड्डे भरण्याचा खर्च
वर्ष खर्च
२०१५-१६ १० कोटी
२०१६-१७ ७ कोटी
२०१७-१८ ७.७३ कोटी