Join us  

निकृष्ठ दर्जामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे, वॉचडॉग फाउंडेशनने पालिका आयुक्तांना सूचवल्या उपाययोजना

By मनोहर कुंभेजकर | Published: July 14, 2024 6:52 PM

मुंबईत गेल्या रविवारपासून पडलेल्या पावसात मुंबईत निकृष्ठ दर्जामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडत आहे.

मुंबई- पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडणे हे मुंबईकरांसाठी अंगवळणी पडले आहे. मुंबईत गेल्या रविवारपासून पडलेल्या पावसात मुंबईत निकृष्ठ दर्जामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडत आहे. के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, चर्च रोड, मरोळ येथे खड्डेच खड्डे पडलेले आहे.

वांद्रे वरळी सी-लिंक आणि सहार एअरपोर्ट एलिव्हेटेड रोडवर खड्डे का नाहीत, कारण त्यांची देखभाल खासगी एजन्सी व्यवस्थित करतात, तर पालिकेचे कंत्राटदार लाच संस्कृतीमुळे मुंबईकरांसाठी निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवतात असे ठाम प्रतिपादन वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या इमेल मध्ये केले आहे.

लोकमतने मुंबईत ठिकठिकाणी पडलेले खड्डे पालिका प्रशासन आणि बेस्टच्या निदर्शनास आणल्या बद्दल त्यांनी लोकमतला धन्यवाद दिले.

दोष दायित्व कालावधीत खड्डे पडलेल्या मागील बांधकामांना जबाबदार असलेल्या अनेक रस्त्यांच्या कंत्राटदारांना कंत्राटे दिली जातात. अशा कंत्राटदारांना भविष्यातील प्रकल्पांपासून रोखून काळ्या यादीत टाकले पाहिजे आणि खड्डे दुरुस्तीचे कंत्राट त्यांना देऊ नये, असे ठाम मत फाऊंडेशनचे विश्वस्तनिकोलस आल्मेडा यांनी व्यक्त केले.

 पालिकेने दि,७ मे रोजी ई-निविदा सूचना उपमुख्य अभियंता (रस्ते), नियोजन प्रभारी यांनी जारी केली होती.प्रस्तावित पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक देखभालीसाठी आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सर्व्हिस रोडच्या खड्डे भरण्यासाठी  तब्बल ७३.५३ कोटी रुपये प्रस्तावित केली होती.पूर्व उपनगरातील फक्त एका सर्व्हिस रोडसाठी ७३.५३ कोटींचा प्रस्तावित खर्च अवाजवी आहे.हा खर्च मुंबईतील सर्व्हिस रोडसाठी केल्यास वार्षिक खर्च रु. ३०० ते रु. ४०० कोटी होऊ शकतो असे मत पिमेंटा यांनी व्यक्त केले.

 खड्डे दुरुस्तीसाठी मानक कार्यप्रणाली नीटपणे पाळल्या जात नाहीत. खड्डे अनेकदा शिफारस केलेल्या खोलीपर्यंत कापले जात नाहीत, मोकळी खडी पुरेशा प्रमाणात स्वच्छ केली जात नाही,परिणामी रस्ते वेळेआधीच वाहतुकीसाठी पुन्हा उघडले जातात,प्रवाशांचा खडबडीत प्रवास होतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

एसओपी नुसार खड्डे दुरुस्ती केली आहे याची पडताळणी झाल्यानंतर, कंत्राटदारांची देय असलेली रक्कम आदा करतांना ती अधिकृत आहेत याची खात्री करणे गरजेचे आहे.यावर उपाय म्हणून कंत्राटदारांना देयके देण्याआधी विहित एसओपी नुसार खड्डे दुरुस्त केल्याची पुष्टी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अनिवार्य करणे गरजेचे असल्याची शिफारस पिमेंटा यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

 या समस्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि रस्त्यांच्या देखभाल प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेची खात्री करून त्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वॉचडॉग फाउंडेशनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.

 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाखड्डे