पूर्व द्रुतगती मार्गावरील खड्डे व वाहतूककोंडी वाहन चालकांसाठी अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:09 AM2021-08-18T04:09:37+5:302021-08-18T04:09:37+5:30
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही पूर्व द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. वाहन चालकांसाठी हे खड्डे ...
मुंबई : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही पूर्व द्रुतगती मार्गावरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. वाहन चालकांसाठी हे खड्डे डोकेदुखी ठरत आहेत. सायनपासून मुलुंडपर्यंत असणाऱ्या रस्त्यावरील अनेक छोट्या-मोठ्या खड्ड्यांमुळे येथे वाहन चालविणे धोक्याचे बनले आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. छोट्या खड्ड्यांमधून बाहेर आलेली खडी दुचाकीस्वारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या खडीवरून घसरून मागच्या काही दिवसांमध्ये अनेक अपघातही घडले आहेत, तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या, तसेच मेट्रोच्या कामामुळेही येथे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.
सायन ते चेंबूरदरम्यान एव्हरार्डनगर, सुमननगर, तसेच तेथून पुढे अमर महल, छेडा नगर, घाटकोपर, विक्रोळी व मुलुंड येथे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. गाड्यांचा वेग कमी करावा लागत असल्याने, हे खड्डे आता वाहतूककोंडीचे कारणही बनत आहेत. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने पुन्हा एकदा या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी हा मार्ग लवकर दुरुस्त करा, अशी वाहनचालकांची मागणी आहे.