Join us

खड्ड्यांचे विघ्न अद्यापही कायमच

By admin | Published: September 09, 2016 3:39 AM

रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यावर दुरुस्ती म्हणून तात्पुरती करण्यात आलेली मलमपट्टी असे चित्र सध्या भांडुपमध्ये दिसत असून, महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे भांडुपकरांनी संताप व्यक्त

मुंबई : रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यावर दुरुस्ती म्हणून तात्पुरती करण्यात आलेली मलमपट्टी असे चित्र सध्या भांडुपमध्ये दिसत असून, महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे भांडुपकरांनी संताप व्यक्त केला आहे. महत्त्वाचे म्हणजे गणेशोत्सवातही खड्ड्यांचे विघ्न कायम असून, याबाबत काहीच कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.भांडुप पश्चिम येथील महाराष्ट्रनगर, सह्याद्रीनगर, कोकणनगर, गाढवनाका, शिवाजी तलाव, जंगलमंगल रोड, जनता मार्केट, सुभाष रोड आणि सरदार प्रतापसिंग संकुल येथील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीकडून येथील खड्डे राजकीय कार्यक्रमांवेळी आवर्जून भरले जातात. मात्र त्यानंतर या खड्ड्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. मुख्य रस्त्यांवरील खड्डे भरले जातात; पण आतील रस्त्यांकडे लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षच केले जाते, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात येथील रस्त्यांवरील खड्डे तात्पुरते भरले होते. पण आठवडा उलटण्यापूर्वीच रस्ते उखडले. तात्पुरते खड्डे भरण्याची प्रक्रिया आठवड्यातून एकदा केली जाते. पण पुन्हा परिस्थिती जैसे थे निर्माण होते. गणेशोत्सवात शिवाजी तलावात भांडुप, नाहूर परिसरातील अनेक लहान आणि मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. अशावेळी तात्पुरते भरलेले खड्डे किती दिवस टिकतील, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी खड्ड्यांकडे लक्ष देत रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी येथील काही राजकीय कार्यक्रमांच्या वेळी खड्डे बुजवितात. पण ते अगदी तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. त्यामुळे आठवड्याआधीच येथील खड्ड्यांची पुन्हा दुरवस्था झालेली असते. त्यामुळे खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यापेक्षा एकदाच रस्त्याचे योग्य प्रकारे काम करावे, असे स्थानिक रहिवासी महादेव जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)