शहरातील खड्डे अद्यापही ‘जैसे थे’च
By admin | Published: September 8, 2016 03:59 AM2016-09-08T03:59:17+5:302016-09-08T03:59:17+5:30
श्रीगणेशाचे आगमन होण्यापूर्वी मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन मुंबई महापालिका प्रशासनाने दिले होते
मुंबई : श्रीगणेशाचे आगमन होण्यापूर्वी मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन मुंबई महापालिका प्रशासनाने दिले होते. मात्र, श्रीगणेशाच्या आगमनाला तीन दिवस उलटले, तरीदेखील शहर आणि उपनगरातील खड्डे ‘जैसे थे’च आहेत. महत्त्वाचे म्हणजे, गणेशोत्सवात मुंबईकरांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, म्हणून प्रशासनाने मुंबईत केवळ ३७ खड्डेच शिल्लक असल्याचा कागदोपत्री दावा केला आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र निराळेच आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करत आहे. मात्र, आता पावसाळा संपण्याच्या मार्गावर असूनही पालिकेला खड्डे बुजविण्यात यश आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे, या पूर्वी ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले, त्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने खड्डे पुन्हा उखडल्याची सबब प्रशासनाने पुढे केली आहे.
प्रत्यक्षात महापालिका खड्डे बुजविण्यासाठी ठोस कार्यवाही करत नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. दुसरीकडे गणेशात्सवापूर्वी गणेश आगमनच्या मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठीची कार्यवाही वेगाने केली जाईल, असेही आश्वासन पालिकेने दिले होते. मात्र, आता श्रीगणेशाचे आगमन झाल्यानंतरही खड्डे भरण्यासह आवश्यक ठिकाणी रस्ते समतोल करण्याकडे पालिकेने दुर्लक्षच केले आहे. (प्रतिनिधी)
रात्रीच्या वेळी
खड्डे बुजविले
बंदर पाखाडी रोड, टँक लेन, कांदिवली पश्चिम आणि दादा सावे रोड, समतानगर पोलीस स्थानक रोड कांदिवली पूर्व, हिंदमाता उड्डाणपूल, समर्थ रामदास स्वामी मार्ग, कुर्ला येथील एस़जी़ बर्वे रोड, मेहताब लेन जंक्शन या परिसरातील खड्डे रात्रीच्या वेळेत भरण्यात आले.
खड्डे बुजविण्याची मुदत या पूर्वी दोन वेळा उलटून गेल्यानंतरही मुंबईतील रस्ते खड्ड्यात आहे़त २१ आॅगस्ट रोजी पहिली डेडलाइन संपली, तरीही रस्ते खड्ड्यातच असल्याने अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या जोखमीवर गणेशमूर्ती आणली़ त्यानंतर, २६ आॅगस्टची डेडलाइनही संपली, तरी खड्डे कायम असल्याने, सार्वजनिक मंडळांमध्ये संतापाची लाट उसळली.
उरले केवळ ३७ खड्डे
महापालिकेने ७ सप्टेंबर २०१५ रोजी एकूण ४ हजार ४६५ खड्ड्यांची नोंद केली होती. त्यापैकी ४ हजार ८२ खड्डे बुजविण्यात आले होते, तर ७ सप्टेंबर २०१६ रोजी नोंद झालेल्या ४ हजार २८५ खड्ड्यांपैकी ४ हजार २४८ खड्डे बुजविण्यात आले आहेत. आता केवळ ३७ खड्डे असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिका प्रशासन खड्डे बुजविण्यासाठी कार्यवाही करत आहे. मात्र, आता पावसाळा संपण्याच्या मार्गावर असूनही पालिकेला खड्डे बुजविण्यात यश आलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे, या पूर्वी ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले, त्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने खड्डे पुन्हा उखडल्याची सबब प्रशासनाने पुढे केली आहे.