खड्ड्यांवरचा भराव गेला वाहून, कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:20 AM2018-07-21T02:20:36+5:302018-07-21T02:20:39+5:30
शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई ‘खड्ड्यांत’ गेल्याचे चित्र आहे.
मुंबई : शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई ‘खड्ड्यांत’ गेल्याचे चित्र आहे. या खड्डेमय रस्त्यांतून वाहने चालवताना चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. पालिकेच्यावतीने ४८ तासांत खड्डे बुजवा मोहिम राबविली; मात्र रस्त्याच्या जखमेवर पालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. पावसाच्या शिडकाव्यातच खड्डयांमधील भराव वाहून जात असल्याने पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होत असल्याने कायमस्वरूपी उपाय राबवण्याची मागणी मुंबईकर करीत आहेत.
मुलुंडसह कांजूर, विक्रोळी, विद्याविहार येथील सर्व प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेकडे कोल्डमिक्सची कमतरता असल्याने तात्पुरता उपाय म्हणून खड्डे रेती, दगड, पेव्हरब्लॉक बसवून बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. मात्र, पावसाच्या सरींमध्ये हा तात्पुरता भराव वाहून जातो. शिवाय रस्त्यांवर विटांचे तुकडे आणि माती साचल्याने दुचाकीचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती नाहूर येथील रहिवाशी श्रीनिवास देशमुख यांनी दिली.
मुसळधार पाऊस पडला की, या बुजवलेल्या खड्ड्यातील रेती, दगड, पेव्हरब्लॉक वर डोके काढतात. खड्ड्यामुळे अनेकांचा जीव गेल्याने पालिकेला जाग आली. त्यामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर खड्डे बुजविले. मात्र काही खड्डे बुजविणे अर्धवट सोडून गेल्याचे दिसून येत आहे. विक्रोळीतील कन्नमवारनगर, टागोरनगर याठिकाणांचे खड्डे रेती आणि दगडांनी भरल्यामुळे जोराचा पाऊस पडला की रस्त्यावर पुन्हा खड्डे दिसून येतील.
>दरवर्षीची समस्या
दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात आणि ते भरण्यासाठी कंत्राट काढले जाते. त्यामुळे कंत्राटदारांचा जास्त फायदा होतो. कन्नमवारनगर, टागोरनगर, गांधीनगर येथील खड्डे मागील दोन दिवसापूर्वी डेब्रिज आणि खडी टाकून खड्डे भरले. मात्र पावसाने हे रस्त्यावर खड्डे पुन्हा पडतात.
- गणेश शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते
प्रत्येक रस्त्यावर पाच फूटांच्या अंतरावर खड्डे दिसून येतात. खड्ड्यामुळे वाहन चालकांना, पादचाऱ्यांना त्रास होतोच. तसेच गरोदर महिला प्रवास करताना तिला जास्त त्रास जाणवतो. खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिणामी पाच ते दहा मिनिटांच्या अंतराला तीस ते चाळीस मिनिटे लागतात. खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी दुचाकीचे अपघात झाले आहेत. - महेंद्र रावले, मनसे उपशाखाध्यक्ष, कांजूरमार्ग