सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे, विद्युत रोषणाई बंद, झाडांची वाताहत

By रतींद्र नाईक | Published: July 20, 2023 12:36 PM2023-07-20T12:36:24+5:302023-07-20T12:36:54+5:30

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा!

Potholes on cement roads, electricity off, trees uprooted | सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे, विद्युत रोषणाई बंद, झाडांची वाताहत

सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे, विद्युत रोषणाई बंद, झाडांची वाताहत

googlenewsNext

रतींद्र नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोठा गाजावाजा करीत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महापालिकेने सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत नागरिकांसाठी मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटे, उद्याने, काँक्रिटीकरण, पदपथ, विद्युत स्तंभ, सार्वजनिक भिंतीची रंगरंगोटी अशी विविध १७ प्रकारची कामे हाती घेण्यात आली. मात्र, या सौंदर्यीकरणाचे सध्या तीनतेरा वाजले आहेत.

सिमेंटच्या रस्त्यावर खड्डे पडले असून, रस्त्यालगतची विद्युत रोषणाई बंद आहे, तर झाडांवर रोषणाईकरिता खिळे ठोकण्यात आले असून, काही ठिकाणी कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत. सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत अंतर्गत  रस्त्यांची दुरुस्ती, पदपथाचे सुशोभीकरण, भिंतींना रंगरंगोटी, पूल, पुलाखालील जागांची सुधारणा, समुद्रकिनारे, उद्यानाचे सुशोभीकरण व रोषणाई, किल्ल्यांची रोषणाई, गेट वे ऑफ इंडिया परिसराचे सुशोभीकरण, डिजिटल जाहिरात फलक, शहरी वनीकरण उपक्रम इत्यादी  कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी १ हजार ७२९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .या प्रकल्पासाठी २४ विभागांच्या स्तरावर निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र त्यात अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप भाजपने केला होता.

रस्त्यांवर भेगाच भेगा
मुंबईत सुमारे २ हजार किलोमीटर लांबीच्या डांबरी रस्त्यांवर दर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने महापालिकेने रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. यातील सुमारे एक हजार किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्णही झाले आहे. 
उर्वरित रस्त्यांचे काम टप्प्या-टप्प्याने करण्यात येत आहे. असे असताना नुकतेच बांधण्यात आलेल्या काँक्रिटच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, तर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. 
 दादरच्या हरिश्चंद्र पाटील मार्गाचे पालिकेने काँक्रिटीकरण हाती घेतले. मात्र, नव्याने बांधलेल्या रस्त्यालाही  भेगा पडल्या. त्यामुळे हा भाग पुन्हा नव्याने बांधण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. 

Web Title: Potholes on cement roads, electricity off, trees uprooted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.