मुंबई : मुसळधार पावसानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले असून, पालिका आयुक्तांनी ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मनपा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालयालाच खड्ड्यांचा वेढा पडला आहे. अवघ्या दक्षिण मुंबईची हीच गत असून, वाहतुकीचा खोळंबा होण्यामागे रस्त्यांवरील खड्डे एक मुख्य कारण मानले जात आहे.दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या मोहम्मद अली मार्गावरही ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसते. महत्त्वाची बाब म्हणजे येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर काम केल्यानंतर डांबराचे ठिगळ लावण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसांत या डांबरी ठिगळांनी जागा सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार असो वा चारचाकी चालक, प्रत्येक जण खड्डे चुकवताना वाहतूककोंडीस कारण ठरत आहे. बहुतेकवेळा खड्डे चुकविताना गाडीचा धक्का लागल्याने या मार्गावर किरकोळ भांडणांचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे दुकानदार सांगतात. धक्कादायक बाब म्हणजे मुख्यालयासमोर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी असलेल्या लोकमान्य टिळक मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक दुकानदार अब्दुल सूर्या यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आठवड्यात एक दिवस आड या मार्गावर दुचाकीस्वारांचे अपघात होतात. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही केली जात नाही. नावाला खड्डे बुजविण्याचा प्रकार दिसतो. मात्र अवघ्या ८ ते १० दिवसांत खड्डे पुन्हा डोके वर काढतात.त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होते.मुख्यालयाला सुरक्षा कोण पुरविणार?पोलीस आयुक्त मुख्यालयासमोर असलेल्या खड्ड्यांमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे कोल्डमिक्स लावण्यात आल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक आकाश पुरोहित यांनी केला आहे. परिणामी, या मार्गावर खडी पसरलेली असून पूर्वीचे खड्डे पुन्हा दिसू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसह पोलीस आयुक्तांची खड्ड्यांपासून कोण सुरक्षा करणार, असा प्रश्न आहे.कंत्राटदाराची तक्रार करणार!दक्षिण मुंबईतील खड्ड्यांमध्ये वापरण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कोल्डमिक्सची तक्रार मनपा आयुक्तांकडे करणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक आकाश पुरोहित यांनी व्यक्त केली. आयुक्तांनी कारवाई केली नाही, तर स्थानिक आमदार राज पुरोहित यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‘लोकमत’च्या सर्वेक्षणादरम्यान या मार्गांवर दिसले खड्डे!मनपा मुख्यालयाकडून क्रॉफर्ड मार्केटकडे येणारा डॉ. दादाभाई नवरोजी मार्गपोलीस आयुक्त मुख्यालयाकडून मेट्रो सिनेमागृहाच्या दिशेने जाणारा लोकमान्य टिळक मार्गमोहम्मद अली मार्गावरील जोहार चौक बस थांब्यासमोरमोहम्मद अली मार्गावरून डोंगरीच्या दिशेने जाणाºया एस.व्ही.पी. मार्गावरील पोलीस अधिकारी वसाहतीसमोरशिवसेना, काँग्रेस नगरसेविकानॉट रिचेबल!दक्षिण मुंबईतील शिवसेना नगरसेविका सुजाता सानप आणि काँग्रेसच्या नगरसेविका निकिता निकम या दोन्ही नगरसेविकांच्या प्रभागात खड्डे असल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
दक्षिण मुंबईची वाट बिकट : पोलीस आयुक्तालयाला पडलाय खड्ड्यांचा वेढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 4:56 AM