मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चार वर्षांच्या श्रेया अजय मेश्राम हिचा मृतदेह बुधवारी दुपारी पवईतील एमटीएनएल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या नाल्याजवळ आढळून आला. तिच्यावर बलात्कार करून गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.पवईतील साकी विहार रस्त्यावरील तुंगा गाव येथे राहात असलेल्या अजय मेश्राम यांची चार वर्षांची मुलगी श्रेया ही रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घराच्या परिसरातून बेपत्ता झाली होती. रात्रभर शोध घेऊनही ती न सापडल्याने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तिचा तपास जलदगतीने होत नसल्याने मंगळवारी परिसरातील रहिवाशांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून ‘रास्ता रोको’ केला होता. बुधवारी सकाळी एका नागरिकाला पवईतील एमटीएनएल कार्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याजवळ बालिका मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. तो श्रेयाचा असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, मारेकऱ्याच्या शोधासाठी विविध पथके स्थापन करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक महाडेश्वर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पवईतील बालिकेची बलात्कार करून हत्या
By admin | Published: March 10, 2016 3:41 AM