पवई तलाव भरुन वाहू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 01:24 PM2020-07-05T13:24:39+5:302020-07-05T13:25:10+5:30

तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते...

Powai lake began to overflow | पवई तलाव भरुन वाहू लागला

पवई तलाव भरुन वाहू लागला

Next

 

- १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा  बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव रविवारी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते. या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. (५,४५५ दशलक्ष लिटर). हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Web Title: Powai lake began to overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.