Join us  

पवई तलाव ओव्हर फ्लो

By admin | Published: June 30, 2017 3:15 AM

शहरासह उपनगरात पावसाचा तडाखा सुरूच आहे. गुरुवारची दुपार वगळता सकाळसह सायंकाळी आणि रात्री पावसाने लावलेल्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरासह उपनगरात पावसाचा तडाखा सुरूच आहे. गुरुवारची दुपार वगळता सकाळसह सायंकाळी आणि रात्री पावसाने लावलेल्या हजेरीने मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते. पावसाची बरसात सातत्याने सुरू असतानाच गुरुवारी पहाटे १ वाजता पवई तलाव ओव्हर फ्लो झाला. पवई परिसरात आतापर्यंत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पवई तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा मारा सुरू राहिल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत होत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. शहरात ४९.८९, पूर्व उपनगरात ६९.८६ आणि पश्चिम उपनगरात ५३.८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारसह शनिवारी मुंबईत जोरदार पाऊस बरसेल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे पावसामुळे होणारी पडझड सुरूच आहे. शहरात १, पूर्व उपनगरात १ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. शहरात ७, पूर्व उपनगरात ४ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १८, पूर्व उपनगरात २४ आणि पश्चिम उपनगरात ३८ अशा एकूण ८० ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.