Join us

पवई तलावाची गळती रोखून सुरक्षित करणार; महापालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 1:11 AM

महापालिकेचा निर्णय : तीन कोटींचा निधी ठेवला राखून

मुंबई : पश्चिम उपनगरातील पवई तलावाच्या दुरुस्तीचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.  पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या तलावाची गळती थांबवून त्याची सुरक्षितता वाढविण्यात येणार आहे. धरण सुरक्षा समिती नाशिकच्या अहवालानुसार या तलावाचे बांधकाम मजबूत करण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी रुपये पालिका प्रशासनाने राखून ठेवले आहेत. 

पवई तलावाच्या ठिकाणी संपूर्ण वर्षभर शेकडो मुंबईकर - पर्यटक दररोज येत असतात.  तलावाच्या सुरक्षेसाठी नाशिक येथील महाराष्ट्र राज्य शासनाच्या धरण सुरक्षा समितीकडून नियमित पाहणी करून उपाययोजना सुचविल्या जातात. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेकवेळा दुर्घटना घडल्या आहेत.  

निर्देश देणाऱ्या पाट्या ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.  तलावाच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे शेकडो नागरिक येतात.  या ठिकाणी उद्यानात समाजकंटकांचा शिरकाव होत असल्याने संरक्षक कुंपण भिंत, लोखंडी जाळी बसविण्यात येणार आहे.

असा आहे पवई तलाव

सन १८९० मध्ये बांधण्यात आलेल्या पवई तलावाचे क्षेत्र २.२३ चौरस कि.मी. आहे. तर पाणलोट क्षेत्र ६.६१ चौ. कि.मी. आहे. दगडी बांधकाम असलेल्या या धरणाची लांबी १९१.८ मीटर असून, रुंदी १.९८ मीटर आहे. धरणाची महत्तम उंची ९.१४ मीटर असून, सांडव्याची लांबी १७६ मीटर आहे. तलावात एकूण ५४५ दशलक्ष लीटर पाणीसाठा असतो. हे पाणी पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी वापरले जाते.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी