मुंबई,दि.5- सर्वांनी भरपूर झाडं लावली पाहिजेत, प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, रस्त्यावरती कचरा टाकू नये असं बसल्या जागी ज्ञान वाटणारे आपल्या आजूबाजूला भरपूर असतात. प्रत्येकाला पर्यावरण कसे वाचवले पाहिजे यावर चर्चांमध्ये सहभाग घ्यायचा असतो. मात्र त्यांच्याकडून काही कृती होताना दिसत नाही. पण पवईतल्या महाविद्यालयीन तरुणांनी मात्र प्लास्टिकमुक्त शहरासाठी स्वतः प्रयत्न सुरु केले आहेत.
श्लोक बाबू या पवईत राहणाऱ्या विद्यार्थ्याची बारावीची परिक्षा नुकतीच संपली होती. आता मे महिन्याच्या सुटीत काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होताच. इतर मुलांसारखं नातेवाईकांकडे जायचं, फिरायला जायचं, खेळायचं असे मार्ग होतेच. पण श्लोकने सुटीमध्ये आपली पवई प्लास्टिकमुक्त करण्यासाठी काही करता येईल का याचा विचार सुरु केला. जर आपल्या आजूबाजूला सगळे दुकानदार, भाजीवाले प्लास्टिकच्या पिशव्या वापरत असतील, तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार असे त्याच्या मनात आले. दुकानदारांकडे चौकशी केली तर त्याला समजले या पिशव्या कागदी पिशव्यांपेक्षा एकदम स्वस्त मिळतात म्हणून त्या वापरल्या जातात. ते खरंही होतंच. कागदी पिशव्यांची बाजारामध्ये किंमत चांगलीच महाग आहे, त्यामुळे ठराविक दुकानदारच ते वापरू शकतात. त्यानंतर श्लोकने कागदी पिशव्या स्वस्तात कशा बनवता येतील याचा विचार सुरु केला. घराघरांमधील रद्दी यासाठी वापरली तर होणाऱ्या पिशव्यांची किंमत कमी होईल असा विचार त्याने केला आणि पवईतल्या घराघरांमध्ये जाऊन त्याने रद्दीचे दान करण्याचे आवाहन केले.
झालं. श्लोक आणि त्याचे मित्र एकत्र आले. या सगळ्या मुलांनी घराघरात जाऊन रद्दी गोळा करण्याचा रद्दी ड्राइव्ह आयोजित केला. प्रत्येक सोसायटीमध्ये खाली रद्दीसाठी मोठे खोकेही ठेवले. ज्यांना रद्दी टाकायची आहे, ते या खोक्यांमध्ये रद्दी ठेवू लागले. श्लोक आणि त्याच्या मित्रांनी कागदी पिशव्यांचे महत्त्व पटवून दिल्यामुळे ही सगळी रद्दी त्यांना मोफत मिळाली. आता या मुलांनी त्यापासून कागदी पिशव्या बनवण्यासाठी वांद्र्यातील श्री महालक्ष्मी बचतगटाला ऑर्डर दिली. या बचतगटातील महिलांनी या कागदापासून अत्यंत सुंदर पिशव्या बनवून दिल्या. कच्चा माल मोफत मिळत असल्याने या पिशव्यांची किंमत आकारानुसार अगदी दोन ते तीन रुपयांपर्यंत ठेवता आली. पिशव्या तयार झाल्यानंतर श्लोकच्या टीमने पवईतील भाजीवाले आणि दुकानदारांकडे जाऊन कागदी पिशव्यांचे महत्त्व पटवून त्या घेण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला आणि दुकानदारांनी या पिशव्या वापरण्यास सुरुवात केली. यामुळे बचतगटालाही उत्पन्नाचे साधन मिळाले.
आता श्लोकच्या या गटामध्ये अधिकाधिक स्वयंसेवकांची साथ मिळत आहे. ज्या दिवशी रद्दी ड्राइव्ह करायचा आहे, त्यादिवशी सर्वांना इ-मेल केला जातो. त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार नेमून दिलेल्या भागात हे स्वयंसेवक जातात, लोकांना कागदी पिशव्यांचे महत्त्व पटवून देतात, रद्दी गोळा करतात आणि दुकानदारांनाही प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन करतात. श्लोकने हे काम बचतगटाला दिल्यामुळे त्यांना नव्या ऑर्डर्स मिळू लागल्या. आपण केवळ पैशासाठी काम करत नसून समाजासाठी काही करतोय अशी भावना त्या महिलांमध्ये निर्माण झाली. इतके दिवस काम करुनही त्यांना प्रस्थापित बाजारपेठेत योग्य स्थान मिळत नव्हतं. या कागदी पिशव्यांच्या कामामुळे त्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे.
तुमच्या घरापासूनच सुरुवात करा- श्लोकमी पर्यावरणासाठी काहीतरी करायला हवं यावर नेहमीच विचार करत असे. माझ्या मित्रांशीही चर्चा करत असे. पण आपण काहीतरी करुन दाखवल्याशिवाय या चर्चांना अर्थ नाही हे जाणवत होतं. त्यामुळेच प्लास्टिकमुक्त पवई आणि नंतर मुंबई असा विचार मनामध्ये आला. पवई जर आपण प्लास्टिकमुक्त करु शकलो तर हळूहळू सगळी मुंबई आणि नंतर इतर शहरं प्लास्टिकमुक्त करु शकतो. फक्त प्रत्येकाने आपल्या स्वतःपासून सुरुवात केील पाहिजे. मी रद्दीपासून कागदी पिशव्या बनवण्याचा विचार आमच्या खासदार पूनम महाजन यांना भेटून सांगितला. त्यांनीही मला त्यासाठी सर्व मदत देऊ केली.