लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चंडीगड विद्यापीठात विद्यार्थिनींचे आक्षेपार्ह व्हिडीओ लीक झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याच्या दोन दिवसांनंतर म्हणजे रविवारी रात्री पवईच्या आयआयटी मुंबईमध्येही अशीच एक घटना घडली आहे. ज्यात वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात कॅन्टीन कर्मचारी पिंटू करिया (२२) हा डोकावून पाहताना सापडला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली असून, बुधवारी कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याने पवई पोलिसांकडे असा आरोप केला आहे की, येथील एका कॅन्टीन कर्मचाऱ्याने रविवारी रात्री वसतिगृह १० (एच १०)च्या स्वच्छतागृहामध्ये गुपचूप तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्याच रात्री विद्यार्थिनीने आणि काही प्रतिनिधींनी मिळून पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार याप्रकरणी कलम ३५४(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रविवारी रात्री त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि अखेर अटक करण्यात आली. एका बाथरूममध्ये खिडकीच्या फटीतून कोणीतरी सदर विद्यार्थिनीला पाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेने तातडीने वसतिगृह परिषद आणि अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांचे मोबाइल त्यांनी तपासले. गुन्हेगार एका पाइपवर चढला. ज्यामुळे त्याला खिडक्यांमधून बाथरूममध्ये प्रवेश मिळू शकला, असे विद्यार्थ्याचे म्हणणे आहे.
केवळ महिला कर्मचारी नेमणारआयआयटीने याठिकाणी उपाययोजना केल्या असून, बाहेरील भागातून स्वच्छतागृहामध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे, तसेच कॅन्टीन बंद ठेवण्यात आले असून, आता त्यामध्ये फक्त महिला कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही समजते. अटकेच्या वृत्ताला परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला असून, याप्रकरणी तपास करत असल्याचेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शनिवारी रात्री, अनेक महिला विद्यार्थ्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ एका वसतिगृहाने रेकॉर्ड केल्याच्या आरोपावरून चंदीगड विद्यापीठाचे कॅम्पस आंदोलनाने हादरले होते.