Join us

प्राध्यापकाच्या त्रासामुळे पवईत ‘टिस’च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:17 AM

इंजिनीअरिंग चांगले नसून त्यात नोकऱ्या नाहीत, तू शिक्षण घेऊ नकोस, अशा स्वरूपाच्या प्राध्यापकाच्या टिप्पणीला कंटाळून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पवईत घडली.

मुंबई : इंजिनीअरिंग चांगले नसून त्यात नोकऱ्या नाहीत, तू शिक्षण घेऊ नकोस, अशा स्वरूपाच्या प्राध्यापकाच्या टिप्पणीला कंटाळून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधील(टीस) एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पवईत घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या सुसाईड नोटनुसार, पवई पोलिसांनी प्राध्यापक पी. विजयकुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.संकेत हा पवईच्या रामबाग इमारतीत कुटुंबीयांसोबत राहायचा. त्याची आई डॉक्टर तर वडील दंडाधिकारी आहेत. २०१५ मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण करून त्याने एलएलबीचा अभ्यास सुरू केला. जून महिन्यात त्याने टिसमध्ये एमबीएसाठी प्रवेश घेतला. याच दरम्यान प्राध्यापक विजयकुमार त्याला त्रास देत असल्याचे त्याने पालकांना सांगितले. यामुळे मुलगा तणावात असल्याने त्यांनी त्याच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून उपचारही सुरू केले होते. याच दरम्यान पालकांनी संस्थेकडे ३० आॅक्टोबर रोजी विजयकुमारविरुद्ध लेखी तक्रार केली. त्यानंतर संकेतने घरूनच अभ्यास सुरू केला.९ डिसेंबरला रात्री ११ च्या सुमारास संकेतने झोपण्याचे नाटक केले आणि ३ च्या सुमारास राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. स्थानिकांच्या ओरडण्याने तांबे कुटुंबीयांना जाग आली. त्यांनी मुलाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पवई पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. घटनास्थळावरून त्यांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यात विजयकुमार यांच्या त्रासाबद्दल नमूद करण्यात आले आहे. तसेच ‘जॉबलेस ग्रॅज्युएट इन दी मार्केट’ अशी त्यांनी टिप्पणी केल्याचेही म्हटले आहे. संकेतची आई संगीता यांनी पवई पोलीस ठाण्यात वरील घटनाक्रमाचा उल्लेख केला आहे. विजयकुमार यांच्या टीका-टिप्पणीला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही तक्रारीत आहे. विजयकुमार हे संकेतला मानसिक त्रास देत अपमानास्पद वागणूक देत होते, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यांच्या तक्रारीवरून प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती व.पो.नि. अनिल पोफळे यांनी दिली.

टॅग्स :आत्महत्याशिक्षण