Join us

पवईत सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:51 AM

खासगी संस्थेच्या पैशातून जास्तीचे कमिशन देण्याच्या नावाखाली, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची फसवणूक केल्याची घटना पवईत उघडकीस आली

मुंबई : खासगी संस्थेच्या पैशातून जास्तीचे कमिशन देण्याच्या नावाखाली, सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची फसवणूक केल्याची घटना पवईत उघडकीस आली. यामध्ये त्यांना ५ लाख रुपये गमावले आहेत. या प्रकरणी पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.गोवंडी येथील रहिवासी असलेले अब्दुल कलीम खान (५९) हे अल महेंद्री उर्दू हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर मित्रासोबत ते प्रॉपर्टी दाखविण्याचे काम करत असत. याच दरम्यान त्यांची विनोद यादवसोबत ओळख झाली. गेल्या महिन्यात विनोदने वांद्रे येथील मित्र दुबेसोबत ओळख करून दिली.दुबेने त्याचा मुलगा अभयसोबत खान यांची भेट घेतली. अभयने त्यांना एका संस्थाचालकाकडून पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून खान यांनी पैसे देण्यास होकार दिला. ७ मे रोजी ते ५ लाख रुपये घेऊन पवईत आरोपींची भेट घेतली. खान यांचा विश्वास बसावा, म्हणून आरोपींनी आणखी एका व्यक्तीला सोबत बोलावले होते. तो पोलीस असून सुरक्षेसाठी बोलविल्याची बतावणी खान यांना केली. त्यामुळे खान यांचा या व्यवहारावर विश्वास बसला. खान यांनी त्यांच्याजवळील रक्कम देताच, ठगांनी फिल्मीड्रामा करत ही रक्कम लंपास केली. यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, खान यांनी शनिवारी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पवई पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.