मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते अंबरनाथदरम्यान रविवारी दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत पॉवर ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डर दुरुस्तीचे काम करण्यात येईल.
ब्लॉक कालावधीमध्ये कल्याण ते बदलापूर लोकल सेवा रद्द केली आहे. तर बदलापूर ते कर्जत विशेष लोकल चालविण्यात येतील. मध्य रेल्वेतर्फे रविवारी सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची रविवारच्या मेगाब्लॉकपासून सुटका झाली आहे.
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे येथे सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० पर्यंत तसेच चुनाभट्टी/ वांद्रे ते सीएसएमटी येथे सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत एकही लोकल धावणार नाही. वाशी/ बेलापूर/ पनवेल ते सीएसएमटी येथे सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.२३ पर्यंत तर, वांद्रे/ गोरेगाव ते सीएसएमटी सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.१६ पर्यंत लोकल सेवा बंद असेल. सीएसएमटी ते पनवेल/ बेलापूर/ वाशीपर्यंत सकाळी ९.५३ ते सायंकाळी २.४४ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. सीएसएमटी ते गोरेगाव/ वांद्रे येथे सकाळी १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत लोकल सेवा बंद असेल. ब्लॉक काळात कुर्ला स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वरून कुर्ला ते पनवेल विशेष लोकल चालविण्यात येतील.