Join us

ग्रंथात मन परिवर्तनाची ताकद

By admin | Published: February 27, 2015 10:29 PM

मानवी मनावर परिणाम करण्याची ताकद ग्रंथांमध्ये असते. ग्रंथांमधून मिळणारे विचार समाजात क्रांती घडवतात. ग्रंथवाचनाने माणसाचे जीवनमान बदलते,

अलिबाग : मानवी मनावर परिणाम करण्याची ताकद ग्रंथांमध्ये असते. ग्रंथांमधून मिळणारे विचार समाजात क्रांती घडवतात. ग्रंथवाचनाने माणसाचे जीवनमान बदलते, त्यासाठी सहृदयी विचारांचे ग्रंथ निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर यांनी येथे केले. येथील ज्येष्ठ समीक्षक माधव आचार्य व्यासपीठावर आयोजित ‘ग्रंथोत्सव-२०१५’ मध्ये मराठी भाषा दिनाच्या औचित्याने ‘ग्रंथ माझा गुरू’ या विषयावर बोलताना धारुरकर पुढे म्हणाले, जगामध्ये जास्त समाधान कशात असेल तर ते ग्रंथ वाचनामध्ये आहे. ग्रंथ वाचल्याने आपल्या जीवनाला दिशा व आकार मिळतो म्हणून सर्वांनी ग्रंथवाचन करावे. जीवनामध्ये ग्रंथाचे महत्त्व अवर्णनीय आहे. वि. वा. शिरवाडकर आणि प्रा. शिवाजीराव भोसले या दोन महान व्यक्तींनी मला ग्रंथरूपातून लोकांपर्यंत पोहोचवले. ग्रंथाचे मनन, वाचन, चिंतन करणे हे मानवी जीवनाच्या चिरत्वाचा आविष्कार असतो. ग्रंथसंपदेमुळे भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ग्रंथवाचनाने आत्मजागृती होऊन जीवनशैलीमध्ये बदल होत असल्याचे धारुरकर यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)