पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहनामुळे वीज कंपन्या गॅसवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 12:53 AM2020-04-04T00:53:18+5:302020-04-04T06:38:48+5:30
महाराष्ट्र अंधारात बुडण्याची भीती निरर्थक असल्याचा दावा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातले विजेचे दिवे बंद करून मेणबत्ती आणि दिवे पेटविण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यामुळे विजेची मागणी आणि पुरवठा यांच्यात अचानक तफावत निर्माण झाल्याने पावर ग्रीडमध्ये बिघाड होईल आणि राज्य अंधारात बुडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, वीज पुरवठ्यातला असा चढ उतार हाताळण्याचे सक्षम तंत्रज्ञान आणि अनुभव आमच्याकडे आहे त्यामुळे ही भीती निरथर्क असल्याचा दावा महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्यांकनी केला आहे.
पंतप्रधानांनी शुक्रवारी सकाळी दिवे लावण्याबाबतचे आवाहन केल्यानंतर काही जणांनी त्यांचे स्वागत केले आहे तर काही जणांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. परंतु, या आवाहनामुळे महावितरण आणि महापारेषण या कंपन्यांची कसोटी लागेल. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मागणी व पुरवठा यांच्यातले गुणोत्तर योग्य ठेवत त्याची फ्रिक्वेन्सी कामय ५० मेगाहर्टझ पेक्षा कमी ठेवावी लागते. ती जबाबदारी लोड डिस्पॅच सेंटरचे असते.
फ्रिक्वेन्सी बिघडली तर वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम होते. त्यामुळेच पुरवठ्यापेक्षा मागणी वाढली, तर लोडशेडिंग किंवा अतिरीक्त वीज खरेदी करावी लागते. तसेच, मागणी घटली तर वीज निमिर्ती संच बंद करून मागणी व पुरवठ्यातला ताळमेळ साधला जातो. रविवारी रात्री अचानक विजेचे दिवे बंद होतील. त्यामुळे वीज पुरवठा व मागणीमध्ये तफावत निर्माण होईल. त्यावेळी फ्रिक्वेन्सी राखता न आल्यास ग्रीडमध्ये बिघाड होईल व पुढील काही तास राज्य अंधारात बुडेल अशी भीती व्यक्त होत आहे.
याबाबत महानिमिर्ती, महापारेषण व महावितरण या तिन्ही कंपन्यांच्या अधिका-यांशी चर्चा केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होणार नाही असा दावा त्यांनी केला. वीज पुरवठ्याचे तंत्रज्ञान आता झपाट्याने विकसीत झाले आहे.
एआयपीईएफचा पंतप्रधानांना ई मेल
आँल इंडिया पावर इंजिनिअरींग फेडरेशन (एआयपीईएफ) यांनी या आवाहनामुळे होणा-या परिणामांबाबतचे एका ई मेल पंतप्रधान कार्यालयाला केल्याची माहिती हाती आली आहे. त्यात योग्य तो सल्ला दिल्याचेही अधिका-यांचे म्हणणे आहे. मात्र, या पत्रातला सविस्तर मजकूर सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
वीज कंपन्यांची प्रतिष्ठा पणाला
पंतप्रधानांच्या आवाहनामुळे ग्रीडमध्ये बिघाड होईल या भितीची दखल केंद्र सरकारनेही घेतली आहे. तशी परिस्थिती ओढावली तर सरकारची नाचक्की होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज कंपन्यांना काटेकोर नियोजन करण्याचे आदेश दिल्याने वीज कंपन्यांचे अधिकारीही धास्तावले आहेत. दुर्दैवाने काही गोंधळ झाल्यास आमची काही खैर नाही अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.