मुंबई : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास यासाठी वचनबद्ध आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यापारी व औद्योगिक संघटना तसेच निवासी ग्राहकांना १०० टक्के हरित ऊर्जा पुरवली जात असून, वीज ग्राहक आता हरित ऊर्जेचा पर्याय निवडत आहेत. या ग्राहकांमध्ये मुंबईतील आयटी कंपन्या, बँका आणि ग्राहकोपयोगी व्यवसाय समूहांचा समावेश आहे.
टाटा पॉवरच्या ३७पेक्षा जास्त ग्राहकांनी हरित ऊर्जेचा पर्याय निवडला आहे. या ग्राहकांमध्ये मुंबईतील आयटी कंपन्या, बँका आणि ग्राहकोपयोगी व्यवसाय समूहांचा समावेश आहे. १०० टक्के हरित ऊर्जा देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मार्च २०२१मध्ये दिलेल्या मंजुरीच्या आधारे ग्राहकांना हरित ऊर्जा देऊन सक्षम करण्याची प्रक्रिया एप्रिल २०२१पासून सुरु करण्यात आली आहे. हरित ऊर्जा मिळवू इच्छिणारे ग्राहक वीज आयोगाने दिलेल्या मंजुरीनुसार हरित शुल्क भरत आहेत. गेल्या महिन्यात १०० टक्के हरित ऊर्जा वापर केल्याची पहिली हरित बिले या ग्राहकांना पाठविण्यात आली आहेत.
अदानी इलेक्ट्रिसिटीनेदेखील मुंबई-ग्रीन दर पुढाकार सादर केला असून, कॉर्पोरेट्स, औद्योगिक, व्यावसायिक, हॉटेल्स व रेस्टाॅरंट तसेच निवासी अशा सर्व वीज ग्राहकांना हरित ऊर्जेचा पर्याय स्वीकारता येणार आहे. हरित दर पुढाकार स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ६६ पैसे अतिरिक्त द्यावे लागणार आहे. हरित दर पुढाकारात वीज ग्राहकांना अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्यानुसार टोल फ्री क्रमांकावर कॉल करता येईल. ई-मेल करता येईल. संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घेता येईल. हरित दर पुढाकार स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिट ६६ पैसे अतिरिक्त द्यावे लागतील. एकूण ऊर्जा वापराच्या किती टक्के हरित ऊर्जा असावी, हे निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना असेल. अशा ग्राहकांना मासिक प्रमाणपत्र मिळेल. त्यावर नमूद असेल की, तुम्ही हरित ऊर्जा स्वीकारली आहे. त्या वीजबिलाचा रंग हिरवा असेल.