Mumbai Electricity: ग्रीड फेल झाल्यानं MMR मधील अनेक भागांत वीज पुरवठा खंडित; परीक्षांमुळे विद्यार्थी-पालक काळजीत
By कुणाल गवाणकर | Published: October 12, 2020 10:33 AM2020-10-12T10:33:22+5:302020-10-12T11:09:58+5:30
Mumbai Navi Mumbai Thane Power Cut: वीज खंडित झाल्यानं विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन शिक्षणात अडथळा. अनेक लोकलदेखील थांबल्या. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो.
मुंबई: मुंबईसह आसपासच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ग्रीड फेल झाल्यानं बत्ती गुल झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीतील वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक लोकलदेखील थांबल्या आहेत. वीज पुरवठा सुरळीत होण्यास किमान एक तासाचा अवधी लागू शकतो.
टाटा कडु्न येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
— BEST Electricity (@myBESTElectric) October 12, 2020
गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाते.
मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये महावितरण, अदानी, बेस्टच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात येतो. या सगळ्याच शहरांमधील वीजपुरवठा एकाच वेळी खंडित झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. विद्यापीठ विभागाच्या व आयडॉल परीक्षा १८ तारखेपर्यंत नाहीत. मात्र, महाविद्यालयीन स्तरावरच्या परीक्षांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा यंदा क्लस्टर पद्धतीने होत असल्यानं लीड महाविद्यालय आणि त्यातील इतर महाविद्यालयं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेत आहेत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे विशेषतः ११ ते १२ या वेळेतील आणि पुढील सत्रातील परीक्षा रद्द केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
मुंबई तसेच ठाणे व आसपासच्या परिसरातील वीज पुरवठा काही तांत्रिक कारणांमुळे तात्पुरता खंडित झाला असून त्यावर दुरुस्ती करीता तातडीने पाऊले उचलली जात आहेत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 12, 2020
जनतेने संयम ठेवून सहकार्य करावे ही विनंती
महापारेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात सर्किट १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो पूर्ववत करण्याचं काम सुरू आहे. विद्यार्थ्यांसोबतच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही या पॉवर कटचा फटका बसला. कारण या बिघाडामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे.
#PowerOutage
— Central Railway (@Central_Railway) October 12, 2020
Mumbai Suburban trains on CR held up due to grid failure. We will update ASAP. Kindly bear with us.