मुंबई : कोरोनाविरोधातील लढा आणखी बळकट करण्यासाठी सर्वच स्तरातून उपाय योजना राबविल्या जात असतानाचा आता खासगी कंपन्यादेखील यात मागे राहिलेल्या नाहीत. याचे ताजे उदाहरण म्हणजे मुंबईच्या उपनगरात वीज पुरवठा करत असलेल्या टाटा पॉवर या वीज कंपनीनेदेखील कोरोनाविरोधातील लढयात उडी घेतली आहे. वीज कंपनीने आपल्या सर्व कर्मचारी वर्गाची काळजी घेतली असून, फिल्डसह कंट्रोल रुममध्ये कार्यरत कर्मचा-यांसाठी विशेष उपाय योजना आखल्या आहेत. ट्रॉम्बे कॉलनीमध्ये टास्क फोर्स (स्वयंसेवक) नेमण्यात आले असून हातमोजे, मास्क्स, सॅनिटायझर्स इत्यादी व्यक्तिगत बचाव साधने स्वयंसेवकांना पुरवली गेली असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आणीबाणीची स्थिती उद्भवल्यास उपयोग व्हावा यासाठी मुंबईतील गेस्ट हाऊसेस ब्लॉक्ड ठेवण्यात आली आहेत.
देशातील सहा राज्यांमध्ये असलेले सर्व ११ औष्णिक प्रकल्प (ट्रॉम्बे थर्मल पॉवर प्रोजेक्टसहीत) आणि जल विद्युत प्रकल्प या काळातही सुरु राहावेत यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. ७० साईट्सवर शाश्वत ऊर्जा प्रकल्प सुरु आहेत. सर्व महत्त्वाच्या संघटनांना आणि घरोघरी क्वारंटाईन करत असलेल्या कोट्यवधी जनतेला अखंडित ऊर्जा पुरवठा केला जावा यासाठी कर्मचारी अथक काम करत आहेत. ८ तासांची असलेली शिफ्ट आता ट्रॉम्बे पॉवर प्लांटसारख्या महत्त्वाच्या साईट्सवर १२ तासांची करण्यात आलेली आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वीज प्रकल्पाच्या कामकाजात खंड पडू नये यासाठी आम्ही टीम्समध्ये काम केले जात आहे. त्यामुळे एक टीम एक दिवस वीज प्रकल्पाच्या ठिकाणी काम करते आणि दुस-या दिवशी तेच कर्मचारी आपापल्या घरून काम करतात. त्यादिवशी दुसरी टीम वीज प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असते. अशाप्रकारे टीम्सचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क होत नाही. टीम्स एक दिवस आड कामावर येतात आणि यामुळे त्यांचा प्रवासाचा वेळ देखील खूप मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. सर्व टीम्ससोबत सातत्याने संपर्कात राहता यावे आणि सर्व कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीतपणे चालावे यासाठी स्काईप, मायक्रोसॉफ्ट टीम इत्यादी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कर्मचारी वर्गासाठी योग, ध्यानधारणा आणि मन:शांती यासाठी विशेष शिबिरे इत्यादी उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. ताणतणाव कसे हाताळावेत यासाठीचे उपाय त्यामध्ये शिकवले जातात.
बस आणि कार्यालयांमध्ये धोका टाळण्यासाठी दर थोड्या थोड्या वेळाने त्यांची सफाई व निजंर्तुकीकरण करण्यात येते. प्रवास करताना आणि वर्कस्टेशन्सवर काम करताना कोणती काळजी घ्यावी याच्या सूचना आम्ही आमच्या कर्मचा-यांना दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, झिगझॅग पद्धतीने बसावे, प्रवेशद्वारावर जमिनीवर खुणा केलेल्या ठिकाणीच उभे राहावे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावे.- प्रवीर सिन्हा, व्यवस्थापकीय संचालक, टाटा पॉवर
अशी घेतली जाते काळजी
- मुख्य प्रवेशद्वारे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सॅनिटायझर्स ठेवण्यात आले आहेत.
- आमच्या सर्व कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारांवर इन्फ्रारेड थमोर्मीटर्स उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.
- सर्व अत्यावश्यक विभागांचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी २४ तास वाहने उपलब्ध आहेत.
- मुंबईतील आमच्या सर्व कार्यालयांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
- कंपनीच्या मालकीची कॉलनी आणि गेस्ट हाऊसेसमध्ये सॅनिटायझेशनचे काम सुरु केले आहे.
------------------------