Join us

देवनार कचराभूमीवर वीजनिर्मिती

By admin | Published: November 15, 2016 4:59 AM

मुंबईत वाढत्या कचऱ्याच्या डोंगरासाठी कचराभूमी कमी पडत असल्याने अखेर पालिका प्रशासनाने स्वत:च कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यास सुरुवात केली

मुंबई : मुंबईत वाढत्या कचऱ्याच्या डोंगरासाठी कचराभूमी कमी पडत असल्याने अखेर पालिका प्रशासनाने स्वत:च कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कांजूरमार्ग कचराभूमीवर पहिला प्रयोग झाल्यानंतर आता देवनार कचराभूमीवर काम सुरू होणार आहे. येथे दररोज सरासरी तीन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे देवनार कचराभूमीवर वारंवार लागणाऱ्या आगीचा प्रश्न सुटून गोवंडी, मानखुर्दच्या नागरिकांना मोकळा श्वास घेता येणार आहे.मुंबईत दररोज सुमारे दहा हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. मात्र या कचऱ्याचा भार पेलण्यासाठी मुंबईत केवळ तीन कचराभूमी शिल्लक आहेत. यापैकी मुलुंड कचराभूमी बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर देवनार कचराभूमीचीदेखील हीच स्थिती आहे. त्यात कचऱ्याला वारंवार आग लागण्याची घटना घडत असल्याने अखेर कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा पर्याय पुढे आला. असे दोन प्रकल्प कांजूरमार्ग कचराभूमीवर उभे आहेत.कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी देवनार कचराभूमीवर जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या जागेवर उभा कचऱ्याचा डोंगर फोडून ही जागा मोकळी करून सपाटीकरण केले जाणार आहे. आॅक्टोबर महिन्यात या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यानुसार या प्रकल्पावर जानेवारी २०१७ मध्ये काम सुरू होणे अपेक्षित आहे. २५ ते ३० मेगावॅट वीजनिर्मिती या प्रकल्पातून होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)