टाकाऊ भाजीपाल्यांपासून वीजनिर्मिती; ग्रँट रोडमध्ये एमएमआरसी उभारणार प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:42 AM2024-02-23T10:42:39+5:302024-02-23T10:44:11+5:30
मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे.
मुंबई : मुंबईमेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसी) सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. ग्रँट रोड येथील एलटी मार्केटमधील वाया गेलेला भाजीपाला आणि अन्य ओल्या कचऱ्यापासून ही वीजनिर्मिती केली जाणार आहे. या विजेतून ग्रँट रोड येथील एलटी मार्केट प्रकाशित केले जाणार आहे. त्यासाठी एमएमआरसीने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
कुलाबा ते सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गिकेच्या आड काळबादेवी-गिरगाव येथील के ३ इमारत येथील इमारती येत होत्या. एमएमआरसीकडून या इमारतींचा पुनर्विकास केला जात आहे. एमएमआरसीला या पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी देताना पालिकेने काही पर्यावरणीय अटी घातल्या होत्या. त्या अटींच्या पूर्ततेसाठी एमएमआरसीकडून हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
हा प्रकल्प स्वच्छ ऊर्जेचे उत्पादन सुलभ करण्यासोबतच पालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्याचे पर्यावरणदृष्ट्या योग्य व्यवस्थापनही करेल. यामुळे कचऱ्याच्या वाहतुकीचा खर्च कमी होईल. हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासदेखील मदत मिळणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हा एक फायदेशीर उपाय ठरणार आहे. - आर. रमणा, संचालक, एमएमआरसी नियोजन विभाग
१.५ टीडीपी क्षमता :
पालिकेच्या सेंद्रिय ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा १.५ टीडीपी क्षमतेचा बायो-मिथेनेशन प्लांट एमएमआरसी उभारणार आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या बायोगॅसपासून वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यातून एमएमआरसीला जवळपास ८० ते १०० किलोवॅट वीज मिळेल. ही वीज ग्रँट रोड येथील एलटी मार्केट प्रकाशित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच एमएमआरसीने या कामाचे कंत्राट एरोकेअर एव्हिएशन सर्व्हिसेस या एजन्सीला दिले आहे. या कंत्राटदाराला हा प्रकल्प बसवून द्यावा लागणार आहे.