लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तोक्ते चक्रीवादळामध्ये खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाला असून, कोयना जल विद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीदेखील पूर्वपदावर आली आहे, अशी माहिती महानिर्मितीकडून देण्यात आली. चक्रीवादळात अनेक आव्हानांवर मात करत अभियंता, तांत्रिक कर्मचारी यांनी परिश्रम करत तीन तासांच्या आत वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर अहोरात्र पूर्ण केले. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत कोयना प्रकल्पामधून वीज निर्मिती पूर्ववत करणे शक्य झाले, असेही महानिर्मितीकडून सांगण्यात आले.
चक्रीवादळामुळे कोयना जल विद्युत प्रकल्प टप्पा क्रमांक ३ मधील वीज निर्मिती तांत्रिक बिघाडाने ठप्प झाली होती. हा टप्पा सुरू करण्यासाठी आवश्यक वीज पुरवठा करणाऱ्या पेढांबे स्वीच यार्डमधील टी. वाय २ व टी. वाय ३ व ४ या वीज वाहिन्या या चक्रीवादळात बंद पडल्या होत्या. त्यानंतर तेथील पर्यायी वीज वाहिन्या एस. वाय १ व २ मधून वीज पुरवठा सुरू करून टप्पा क्रमांक ३ प्रकल्प चालू करण्यात आला. मात्र वारा व पाऊस यामुळे या पर्यायी वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यासुद्धा बंद झाल्या. कोयना प्रकल्प टप्पा क्रमांक ३ अंधारात गेला. टप्पा क्रमांक ३ मधून वीज निर्मिती बंद झाल्याने कोळके वाडी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती नियंत्रित करण्यासाठी कोयना जल विद्युत प्रकल्प टप्पा क्रमांक १, २ व ४ मधील वीज निर्मिती कमी करावी लागली होती. यावर मात करत वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले गेले.