शासनाची ताकद पत्रकारांच्या पाठीशी - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:26 AM2019-01-24T05:26:25+5:302019-01-24T05:26:34+5:30

पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम राहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे.

The power of the government is behind the journalists - Chief Minister | शासनाची ताकद पत्रकारांच्या पाठीशी - मुख्यमंत्री

शासनाची ताकद पत्रकारांच्या पाठीशी - मुख्यमंत्री

Next

मुंबई : पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम राहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य देण्यासाठी सरकारने विविध निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमात संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कृ. पां. सामक जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक माध्यम - ‘न्यूज १८ लोकमत’चे महेश तिवारी, वृत्तपत्र- ‘इंडियन एक्स्प्रेस’चे विश्वास वाघमोडे, संघाच्या सदस्यांकरिताचा पुरस्कार ‘न्यूज १८ लोकमत’च्या प्राजक्ता पोळ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘लोकमत वृत्त समूहा’चे समूह संपादक दिनकर रायकर, ‘एबीपी माझा’चे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, सविता रणदिवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह प्रमोद डोईफोडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, गेली चार वर्षे चौथ्या स्तंभाला स्थैर्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. लवकरच ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना कार्यान्वित करण्यात येईल. पत्रकारांच्या घराबाबतही म्हाडाच्या माध्यमातून योजनांची तयारी केली आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. एक महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांच्या समावेशाबाबत व्याख्या व्यापक केल्याने, पत्रकारांच्या कुटुंबीयांनाही आरोग्य सुविधा मिळतील. चौथ्या स्तंभाच्या पाठीशी राज्य सरकार ताकदीने उभे आहे.
दिनकर रायकर यांनी दिनू रणदिवे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून त्यांच्यासमवेत केलेल्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. राजीव खांडेकर यांनी दिनू रणदिवे यांचा वारसा चालविणारे पत्रकार वाढीस लागो. यात समाजहित असल्याचे म्हटले.
सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेचा लेखाजोखा व अनुभव मांडले. पत्रकारिता क्षेत्रातील आपले गुरू पा. वां. गाडगीळ यांच्या प्रति आदर व्यक्त करून त्यांचे तैलचित्र पत्रकार संघाला भेट दिले असल्याचे सांगितले. संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे कार्य स्पष्ट केले. या जीवन गौरव पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कार दिल्याने पुरस्काराला उंची प्राप्त झाल्याचे सांगितले. या वेळी आमदार कपिल पाटील यांच्यासह माहिती व जनसंपर्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
>दिनू रणदिवे व्रतस्थ पत्रकार - मुख्यमंत्री
जीवन गौरव पुरस्कारार्थी दिनू रणदिवे हे व्रतस्थ पत्रकार आहेत. त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली हे मोठे भाग्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रणदिवे यांनी प्रत्येक लढ्यात सक्रिय भूमिका निभावली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता वृत्तपत्र सुरू केले. आदर्श पत्रकारांसाठी असणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत. या वेळी युवा पुरस्कार विजेत्यांचाही मुख्यमंत्र्यांनी गौरव केला. शासनाच्या चुका होत असतील, तर ते दाखवून देणे हे पत्रकारितेचे कार्यच आहे. आम्हाला जरी खुलासे द्यावे लागले तरी चालेल; पण पत्रकारांनी पत्रकारितेचे हे व्रत जोपासावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The power of the government is behind the journalists - Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.