वीज गुल अन् अधिकारी अंधारात
By admin | Published: July 31, 2014 02:09 AM2014-07-31T02:09:15+5:302014-07-31T02:09:15+5:30
पद्मावती येथील चार सोसायट्यांचा वीजपुरवठा गेल्या अडीच वर्षांपासून रोज आठ ते दहा वेळा खंडित होत असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.
पुणे : पद्मावती येथील चार सोसायट्यांचा वीजपुरवठा गेल्या अडीच वर्षांपासून रोज आठ ते दहा वेळा खंडित होत असल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. महावितरणकडे अनेकदा तक्रार करूनही हा प्रकार नक्की कशाने होत आहे, याविषयी अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. वीजपुरवठा दोन मिनिटांपासून ते २० मिनिटांच्या कालावधीसाठी जात आहे. तसेच, विद्युत दाब कमी-जास्त होत असल्याने विजेची उपकरणे जळून नुकसान होत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
पद्मावती विद्युत विभागाच्या समोरील बाजूस असणाऱ्या अमृतेश्वर, स्वाती, विवेक, अभिनव व लगतच्या परिसरात हा प्रकार सुरू आहे. या सोसायटीतील नागरिकांनी ‘लोकमत’ला आपल्या व्यथा सांगितल्या. अडीच वर्षांपूर्वी या परिसरात भूमिगत वाहिनी टाकण्यात आल्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे सोसायटीतील नागरिकांचे म्हणणे आहे. अधिकारी कधी तांत्रिक अडचणी, कधी रस्त्याची कामे असल्याने जेसीबीचा धक्का लागून वाहिनीत बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे विद्युत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, याच सोसायटीला दररोज हा त्रास का होत आहे, यावर मात्र त्यांना ठामपणे उत्तर देता येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
अमृतेश्वर सोसायटीतील वैशाली उपाध्ये म्हणाल्या, ‘‘सातत्याने वीजपुरवठा जात असल्याने पद्मावती येथील विद्युत कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता ते जनरेटर, इनव्हर्टर बसविण्याचा सल्ला देतात. भूमिगत वीजवाहिनी झाल्यापासून हा त्रास सहन करीत आहोत. माझा स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. नवीन डिझाईनचे काम करीत असताना अचानक लाईट गेल्याने फाईल क्रॅश होण्याचे प्रकार झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते.’’
मीरा देशपांडे म्हणाल्या, ‘‘गेल्याच आठवड्यात विद्युत दाब वाढल्याने विजेची बेल व फ्यूज उडाल्याची घटना घडली. आर्थिक नुकसानीबरोबरच एखादा गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांना वाटत आहे.’’
स्वाती हौसिंग सोसायटीतील अभिजित बोराडे म्हणाले, ‘‘विद्युत दाब कमीजास्त होणे, अनेकदा लाईट जाणे यांमुळे संगणकावर काम करता येत नाही. विजेअभावी कामे खोळंबतात. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून हा प्रकार होत आहे. आजूबाजूच्या सोसायट्यांना मात्र हा त्रास होत नाही. याच सोसायटीमध्ये असे का होते, याचे ठोस कारण दिले जात नाही. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास यापुढे बिल न भरण्याच्या विचारात नागरिक आहेत.’’ (प्रतिनिधी)