सुशांत मोरे, मुंबईउपनगरांचा विस्तार होऊ लागला आणि डोंबिवली व कल्याणच्या दरम्यान ठाकुर्ली स्थानक सुरू झाले. पण आजूबाजूच्या दोन्ही स्थानकांच्या तुलनेत या स्थानकाचा फारसा विकास अद्याप झालेला नाही. या स्थानकाची ओळख केवळ इथल्या बंद पडलेल्या पॉवर हाऊसपुरतीच सीमित राहिली. २०१० सालच्या रेल्वे अर्थसंकल्पात इथे पुन्हा पॉवर हाऊस सुरू करण्याची तरतूद होती, मात्र ते अद्याप रखडलेलेच आहे.सध्या या स्थानकात दोन प्लॅटफॉर्म असून एक पादचारी पूल आहे. ब्रिटिश काळात मुंबई डिव्हिजनला वीजपुरवठा करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात पॉवर हाऊस सुरू करण्यात आले. तिथे कोळशापासून वीजनिर्मिती केली जात असे. मात्र १९८७ साली तिथल्या बॉयलरचा स्फोट झाला. त्यात सात कामगार मृत्युमुखी पडले आणि १९८८ साली हे पॉवर हाऊस बंद पडले, ते कायमचेच. ममता बॅनर्जी यांनी २0१0 साली मांडलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात इथे पुन्हा ७०० मेगावॅट क्षमतेचे पॉवर हाऊस सुरू करण्याची तरतूद केली. मात्र अद्याप त्याचे घोडे अडलेलेच आहे. इथे पुन्हा कोळशापासूनच वीजनिर्मिती सुरू करण्यात येणार होती. मात्र वाढलेल्या लोकसंख्येचा आणि कोळशावर वीजनिर्मिती केल्यास होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करता वीजनिर्मितीसाठी नैसर्गिक वायूचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. इथे रेल्वेच्या मालकीची मुबलक जागा आहे. पश्चिमेला रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी वसाहत आहे. उपनगरीय रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या टाटा कंपनीचे एक रिसिव्हिंग स्टेशन या स्थानकाजवळच आहे. त्याची ट्रान्समिशन लाइन पुणे आणि इगतपुरीपर्यंत गेली आहे. ही जागा स्टेशनला लागूनच आहे. सध्या याचा उपयोग बदलापूर आणि टिटवाळ््याच्या पुढे रेल्वेला वीजपुरवठा करण्यासाठी होतो.
पॉवर हाऊसचे घोडे अद्याप अडलेलेच!
By admin | Published: September 22, 2014 1:25 AM