लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही. यापूर्वी बिहार सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने ते रद्द केले. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार हे लोकसभेला आहेत. त्यामुळे सर्व समाजाच्या नेत्यांना पंतप्रधान मोदींकडे जावे लागेल, अशी भूमिका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केली.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करीत मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही अनेकदा भूमिका मांडली आहे. आरक्षणाबाबत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजांच्या नेत्यांना बोलावून सर्वमान्य तोडगा काढावा. आमचा त्याला पाठिंबा असेल.