चक्रीवादळग्रस्त ९९.९६ टक्के भागात वीज सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:06 AM2021-05-30T04:06:22+5:302021-05-30T04:06:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीज यंत्रणेला तडाखा दिला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांमधील वीज यंत्रणेला तडाखा दिला. २०१ उपकेंद्र, १३४२ उच्चदाब वीजवाहिन्या व ३६ हजार ३० वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ५,५७५ गावांमधील वीजपुरवठा विस्कळीत झाला हाेता, तर ३५ लाख ८७ हजार २६१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणने वीज यंत्रणेची उभारणी, दुरुस्ती करून पंधरवड्यात ३५ लाख ८७ हजार म्हणजे ९९.९६ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला.
कोरोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीत महावितरणचे ८७२ अभियंते, ५,४४६ कर्मचारी, ३,६२८ बाह्यस्त्रोत कर्मचारी तसेच ३०७ एजन्सींचे ३,८४० कर्मचारी अशा एकूण १३,७८६ कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम केले. शहरी भागातील वीजपुरवठा अवघ्या २० मिनिटांपासून दीड ते दोन तासांमध्ये पूर्ववत केला. ३०६ कोविड रुग्णालये, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र, १४ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचा वीजपुरवठा त्वरित सुरू केला. ४,६६० सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तसेच १,६८५ मोबाईल टॉवर्सचा वीजपुरवठाही पूर्ववत करण्यात आला.
महावितरणने ३५ लाख ८७ हजार २६१पैकी ३५ लाख ८५ हजार ७८८ (९९.६६ टक्के) ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत केला. यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा चक्रीवादळानंतर तीन ते चार दिवसांमध्येच सुरळीत झाला. पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या अतिदुर्गम भागातील उर्वरित १,४७३ ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
..................................................