Join us

तांत्रिक बाबींमुळे वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 9:18 AM

अहवालातील माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेशात १२ ऑक्टोबर रोजी खंडित झालेल्या वीजपुरवठा प्रकरणाचा अहवाल समोर ...

अहवालातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात १२ ऑक्टोबर रोजी खंडित झालेल्या वीजपुरवठा प्रकरणाचा अहवाल समोर आला आहे. त्यानुसार, तांत्रिक बाबींमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची प्राथमिक माहिती समजते. गेल्या आठवड्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमोर या अहवालाचे सादरीकरण केले गेले. कॅबिनेटसमोर हा अहवाल सादर झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यावर कॅबिनेटपुढे आणला जाईल.

मुंबईतील वीजपुरवठा खंडित प्रकरणी तीन समित्या स्थापन झाल्या असून त्यातील एका समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मात्र वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. या अहवालात मात्र कोणताही घातपात किंवा सायबर हल्ल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असे समजते. टाटा वीज कंपनीच्या अंतर्गत असलेली मुंबईची आयलँडिंग यंत्रणा १२ ऑक्टोबरला मुंबईला बाहेरून येणारा वीजपुरवठा बाधित झाल्यावर कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र ती कार्यान्वित न झाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काही तास वीज खंडित होऊन मोठा फटका बसला. याची गंभीर दखल राऊत यांनी घेतली आणि त्यादृष्टीने भविष्यातील धोका टाळण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांना भेट देत आढावा घेण्यास सुरुवात केली होती. तर वीजपुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले होते.