मुंबई - एमएसईबीच्या मुलुंड-ट्रॉम्बे वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने मुंबईतील अनेक भागातील विजपुरवठा आज सकाळी खंडित झाला. याचा परिणाम लोकलसेवेवरही झाला. तसेच चर्चगेट-अंधेरी भागातील लोकलसेवा काही काळ बाधित झाली होती. दरम्यान काही काळाने शहरातील काही भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून, मुंबई सेंट्रल ते विलेपार्ले भागातील रेल्वेसेवाही पूर्वपदावर आली आहे.
बेस्टच्या इलेक्ट्रिक सप्लाय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार एमएसईबीच्या मुलुंड ते ट्रॉम्बे २२० केबी ट्रान्समिशन लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ट्रिपिंग झाल्याने मुंबईतील बऱ्याच भागातील वीजपुरवठा सकाळच्या वेळी खंडित झाला होता. दरम्यान काही वेळानंतर शहरातील काही भागांमधील वीजपुरवठा सुरळीत झाला. तसेच वीजपुरवठा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या बिघाडाचा फटका रेल्वेसेवेलाही बसला. मुंबईतील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने चर्चगेट ते अंधेरी विभागातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. मात्र नंतर काही वेळात मुंबई सेंट्रल ते विलेपार्ले दरम्यानची रेल्वेसेवा सुरळीत करण्यात रेल्वेला यश आले.