कोरोनाकाळातील आव्हानांना मात देण्याची ताकद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 04:21 AM2020-08-21T04:21:26+5:302020-08-21T04:22:18+5:30
कोरोनावरील संशोधन, उपचार व लस अशा प्रत्येक विषयासंबंधी अद्ययावत ज्ञानाचा यात अंतर्भाव आहे.
मुंबई : कोरोनाची दहशत संपूर्ण जगावर आहे. या संकटाचा मुकाबला करण्याची दिशा दाखवणारे ‘द कोरोना व्हायरस : व्हॉट यू नीड टू नो अबाऊट ग्लोबल पॅनडॅमिक’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखक डॉ. राजेश पारीख यांनी सांगितले की, कोरोनाकाळातील संकटे त्याचवेळी कर्तव्यावर असताना शब्दबद्ध करणे हे खरे तर आव्हान होते. मात्र हा काळ ऐतिहासिक ठरणारा असल्याने ते पेलायचे ठरविले. हे पुस्तक ११ भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले, ही अभिमानास्पद बाब आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक आठवड्यात या पुस्तकातील लेखन व विषय अद्ययावत होत गेले. कोरोनाकाळातील आव्हानांना मात देण्याची ताकद या पुस्तकात आहे. कोरोनावरील संशोधन, उपचार व लस अशा प्रत्येक विषयासंबंधी अद्ययावत ज्ञानाचा यात अंतर्भाव आहे.
मार्च महिन्यात या पुस्तकाचे प्रकाशन ई-बुक स्वरूपात झाले होते, आता मात्र ते सर्वत्र उपलब्ध झाले आहे, अशी माहिती या पुस्तकाच्या प्रकाशिका पेंग्विन समूहाच्या मिली ऐश्वर्या यांनी दिली. डॉ. स्वप्निल पारीख, महिरा देसाई, डॉ. राजेश पारीख या तीन मान्यवरांनी मिळून पुस्तकाचे लेखन केले आहे. यात कोरोना विषाणूच्या काळात सर्व स्तरांवर येत असलेल्या आव्हानांचा आढावा घेण्यात आला आहे. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन आॅनलाइन कार्यक्रमात पार पडले. याप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा व संस्थापिका नीता अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी उपस्थित होते.
पुस्तकाविषयी लेखक डॉ. स्वप्निल पारीख यांनी सांगितले की,
या पुस्तक लेखनात रुग्णांच्या अनुभवांचीही खूप मदत झाली. प्रत्यक्षात कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात संशोधनाची अधिक गरज आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून आव्हानात्मक काळातील सुरक्षेविषयीही माहिती दिली
आहे.
महिरा देसाई यांनी मनोगतात म्हटले, सुरुवातीच्या लेखन प्रक्रियेत अवघ्या तीन आठवड्यांत विषय साचेबद्धपणे लिहिला. जगभरातील कोविड योद्ध्यांची जिद्द ही या लेखनामागील प्रेरणा आहे. त्यामुळे त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करते.
या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कोरोनाकाळातील सुदृढ शारीरिक व मानसिक स्वास्थ्याशी निगडित विचार जाणून घेण्यास मदत होईल.
।लेखकांची ओळख
डॉ. स्वप्निल पारीख हे मुंबईतील चिकित्सक
असून डीआयवाय हेल्थ केअरचे सहसंस्थापक आहेत. त्यांनी कोविडच्या काळात कस्तुरबा रुग्णालयात महत्त्वाची भूमिका बजावली.
महिरा देसाई मानसशास्त्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक आहेत. सध्या त्या जसलोक संस्थेत मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांनी मानसशास्त्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
डॉ. राजेश एम. पारीख हे मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर येथे वैद्यकीय संशोधन विभागाचे मानद संचालक आहेत. तसेच ज्येष्ठ न्यूरोसायकॅट्रीस्ट आहेत. त्यांनी अमेरिकेतील जॉन्स हापकिन्स मेडिकल संस्थांमध्ये आणि मुंबईतील केईएम रुग्णालयात अध्यापनाचे काम केले आहे.
।मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी पुस्तक उपयुक्त
कोरोनाच्या कठीण काळात सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत. या काळात सर्वसामान्यांची मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी पुस्तक निश्चितच मदत करेल. डॉ. राजेश पारीख यांना अनेकविध विषय-क्षेत्रांविषयी असणारे कुतूहल महत्त्वाचे असून त्यातूनच त्यांनी सृजनशील निर्मिती कायम ठेवली.
- मुकेश अंबानी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड)
।प्रत्येकाने वाचावे असे या काळातील महत्त्वाचे पुस्तक
कोविडमुळे मागील काही महिन्यांपासून आयुष्याविषयी अनिश्चितता, भीती वाढत
चालली आहे. अशा काळात हे पुस्तक महत्त्वाची भूमिका बजावेल याची खात्री आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळातील सुरक्षितता, गैरसमज, खबरदारी, सर्वसामान्यांनी परिस्थितीला कसे सामोरे जावे याकरिता मदत होणार आहे.
- नीता अंबानी (अध्यक्ष व संस्थापिका,
रिलायन्स फाउंडेशन)