संसाधनांची शक्ती हीच भारताची ताकद - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:14 AM2019-02-04T07:14:24+5:302019-02-04T07:14:34+5:30

देशवासीयांचे जीवन सुसह्य आणि सुखकर व्हावे, यासाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे.

The power of resources is the strength of India - Modi | संसाधनांची शक्ती हीच भारताची ताकद - मोदी

संसाधनांची शक्ती हीच भारताची ताकद - मोदी

Next

मुंबई - देशवासीयांचे जीवन सुसह्य आणि सुखकर व्हावे, यासाठी केंद्र सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. राष्ट्रावर कोणतीही कठीण परिस्थिती ओढावल्यास एकमेकांना मदतीचा हात देऊन, आपल्याला लाभलेल्या संसाधनांची जपणूक करणे ही भारताच्या प्रगतशील मार्गाची शक्ती आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दुसऱ्या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) या कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील २५ ‘रुसा’ प्रकल्पांचे डिजिटल लाँचिंग केले. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधील रुसा २.० प्रकल्पाच्या डिजिटल लाँचिंगसाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान म्हणाले की, शहरांसोबतच ग्रामीण भाग तांत्रिकदृष्ट्या विकसित करावा, तसेच तरुणांच्या नवकल्पनांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी रुसा कार्यरत आहे. रुसाच्या माध्यमातून जवळपास पावणेचारशे जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट शिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहेत.
याप्रसंगी वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर तालुक्यातील चिखली येथील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेज, नंदूरबार जिल्ह्यातील नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशीलेचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, तर आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीधर असणे पुरेसे नाही.

पदवीसोबत अंगी कौशल्य असणे ही काळाची गरज असल्याचे तावडे म्हणाले. सेंट झेवियर्स महाविद्यालयातील उद्योजकता सेल व कौशल्य केंद्राचे शिक्षणमंत्री तावडे व आमदार पुरोहित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी महाविद्यालयांना रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम संशोधन व विकास व नवोपक्रम राबविण्यास शैक्षणिक स्वायतत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे. सदर संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायत्तता दिलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता योग्य प्रकारे अमलात आणण्यास भौतिक संरचना व पायाभूत सुविधांकरिता राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात येते.

Web Title: The power of resources is the strength of India - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.