Join us  

आज शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादीत ‘पॉवरफूल’ कोण?, कोणता नेता कुणाच्या बाजूने याची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 6:03 AM

शरद पवार अन् अजित पवार यांनी बोलावली एकाच दिवशी बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर चौथ्या दिवशीही कुणाकडे किती आमदार, याबाबत सस्पेन्स कायम आहे. शरद पवार आणि अजित पवार गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र बुधवारी या संदर्भातील सस्पेन्स दूर होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांकडून बोलावलेल्या बैठकीत कुणाकडे किती आमदार याचे चित्र स्पष्ट होऊन कोण ‘पॉवर’बाज हेही स्पष्ट होणार आहे. शिंदे गट जसा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा वापर करतो, त्याप्रमाणेच अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात आहे. मात्र, माझा फोटो वापरू नका, असा सज्जड इशारा शरद पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष बराच काळ पेटता राहणार आहे.

ताकद अजमवण्यासाठी दोन्ही गटाच्या बैठका बुधवारी मुंबईत बोलवण्यात आल्या आहेत. या बैठकांना आमदार, खासदार, जिल्हा, तालुका पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी आपल्याकडे असल्याचा दावा अजित पवार गट करत आहे. तर आपल्याकडेच जास्त संख्याबळ असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकांमधून कोणाकडे किती ताकद हे स्पष्ट होणार आहे.एकमेकांच्या मांडीला मांडी लावून काम करणारे कार्यकर्ते दोन गटात विभागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखी स्थिती राष्ट्रवादीत निर्माण झाली आहे. 

महाराष्ट्र दौरा नाशकातून थोड्याच दिवसांत नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर व इतर काही जिल्ह्यांत शरद पवार दौरा सुरू करणार आहेत. हा दौरा भुजबळ यांचा प्रभाव असलेल्या नाशिकमधून सुरू होईल. 

प्रफुल्ल पटेल यांचा दावा :४० आमदार आमच्याबरोबरराष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० पेक्षा जास्त आमदारांचा आकडा व कार्यकर्त्यांची मोठी फळी आमच्यासोबत राहणार आहे. ते सर्व आमच्या बैठकीला उपस्थित राहतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे.

जयंत पाटील यांचा दावा :९ सोडून बाकी आमच्याकडे ५३ आमदारांपैकी ९ जणांवर आम्ही कारवाई केली आहे. त्यामुळे ५३ मधील ९ वगळता सर्व आमदार आमच्याकडेच असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

बैठक कुणाची कुठे?

अजित पवार गट सकाळी ११ वाजता वांद्रे येथील एमईटी कॅालेजवर. बैठकीला जास्तीत जास्त आमदार, पदाधिकारी उपस्थित रहावे यासाठी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर नेते प्रयत्नशील आहेत.

शरद पवार गट  दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे. आमदार, पदाधिकारी उपस्थित राहावे यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले असून मंगळवारी दिवसभर पक्ष मुख्यालयात बसून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे सगळ्यांशी संपर्क करत होते.

टॅग्स :शरद पवारअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस