मुंबई : आजवर वीज ग्राहकांसाठी ७ हजारांपेक्षा जास्त स्मार्ट मीटर्स इन्स्टॉल करणाऱ्या टाटा पॉवरने आता मुंबईकर ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरिंग सुविधा प्रदान करत मुंबईत स्मार्ट मीटरिंग सुरू करणारी पहिली वीज वितरण कंपनी बनण्याचा मान मिळवला असून, स्वतःचा वीज वापर किती होत आहे, हे पोर्टल आणि मोबाइल ॲपवर ग्राहक प्रत्यक्षात पाहू शकतात.
प्रत्येक ग्राहकाचा वीज वापर, पद्धती, बिलिंग यासंदर्भात पारदर्शता राखणे स्मार्ट मीटर्समुळे शक्य होते. ग्राहकांना फक्त काही क्लिक्स करून वीज वापरावर लक्ष ठेवता येते. तासाला, दर दिवशी, दर महिन्याला किती वीज वापरली जात आहे यावर देखरेख ठेवणे ग्राहकांसाठी सोपे बनले आहे. स्मार्ट मीटर्समार्फत ग्राहकांना त्यांच्या दर महिन्याच्या वीज वापराची तुलना आधीच्या १२ महिन्यांतील वीज वापरासोबत करून त्याची माहिती दिली जाते. त्यांना स्वतःचा वीज वापर आणि आपल्या इतर ओळखीच्यांच्या सरासरी मासिक वीज वापराची तुलना करता येते. असामान्य प्रमाणात वीज वापर होऊ लागल्यास ग्राहकांना त्याबाबत सूचित केले जाते, जेणेकरून त्यांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येते.
उन्हाळ्यामध्ये बिलिंगसंदर्भात तक्रारी होत्या. आता आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेशन सिस्टिम आणत आहोत. वितरण सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रक्रियेतील उपक्रम म्हणजे स्मार्ट मीटरिंग आहे. स्मार्ट मीटर्समार्फत बिलिंग यंत्रणेमध्ये मीटर रीडिंग्सची आपोआप नोंदणी केली जाते. अशा प्रकारे मॅन्युअल मीटर रीडिंगमुळे होणाऱ्या चुकांची शक्यताच टाळली जाते.