पवईच्या विद्युत उपकेंद्रात बिघाड; कुर्ला, सायन, चुनाभट्टीत पाणीपुरवठा विस्कळीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:37 AM2024-05-14T09:37:24+5:302024-05-14T09:39:54+5:30
विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
मुंबई : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवारी सायंकाळी पाच वाजता पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले. केंद्राला होणारा विद्युत पुरवठादेखील खंडित झाल्यामुळे पालिकेच्या एल आणि एस विभागांतील कुर्ला, सायन, चुनाभट्टी, विक्रोळी, कांजूरमार्ग, कन्नमवारनगर येथील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात आला. विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहनदेखील केले आहे.
मुंबईमध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पवई येथील २२ केव्ही उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे पवई परिसरातील विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला असून, अनेक ठिकाणी वीज वाहिन्याही तुटल्या. तसेच अंधारात दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे.
यामुळे एस विभागातील मोरारजी नगर, जय भीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही, तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने कळविले आहे.
या ठिकाणी पुरवठा बंद ?
एल विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, चित्रसेन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन. रोड बैल बाजार, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, एस जी बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रमियर रसिडेन्स, सुंदरबाग, शिव टेकडी संजय नगर, कपाडिया नगर, रूपा नगर, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एल. बी. एस. रोड, चाफे गल्ली, चुनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरी मरी माता मंदिर परिसर.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू -
महानगरपालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत वरील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्ती झाल्यावर पवई उच्च स्तरीय जलाशय कप्पा क्रमांक २ भरून पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत करण्यात येईल. अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा होऊ न शकल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल पालिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे.