Join us

महावितरणकडून २० हजार ३३० मेगावॅटचा वीजपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 5:28 AM

२० हजार ३३० मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला.

मुंबई : शनिवारी २० हजार ३३० मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. या दिवशीची वीजमागणी आजपर्यंत नोंद झालेल्या विक्रमी कमाल वीजमागणीच्या जवळपास आहे. यापूर्वी २३ एप्रिल २०१८ रोजी २० हजार ३४० मेगावॅट एवढ्या कमाल विजेच्या मागणीची नोंद करण्यात अली होती. ही मागणी मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या कमाल मागणीच्या तुलनेत जवळपास ३ हजार ५०० मेगावॅट इतकी जास्त आहे.हवामानातील बदलामुळे कृषिपंपाकरिता लागणाऱ्या विजेच्या मागणीतील वाढीमुळे एकूण विजेच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे महावितरणशी दीर्घकालीन वीज करार झालेल्या कंपन्यांकडून कमी वीजपुरवठा होत असूनही यशस्वीपणे मागणीची पूर्तता होत आहे, असा दावा यावर महावितरणने केला आहे. दरम्यान, दीर्घकालीन वीजकरार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून एकूण करारात २९ हजार ८४० मेगावॅट क्षमतेपैकी साधारणपणे १४ हजार ३५४ मेगावॅट विजेची उपलब्धता होती. उपलब्ध कमी वीज लक्षात घेता महावितरणने विजेच्या मागणीतील तफावत भरून काढण्यासाठी द्विपक्षीय लघू निविदेद्वारे व इंडियन एनर्जी एक्सचेंजद्वारे वीज खरेदीची व्यवस्था केली होती.

टॅग्स :वीजमहावितरण