मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी विजेचं संकट आहे. ऐन उन्हाळ्यात भारनियमन सुरू आहे. त्यामुळे जनतेला त्रासाला सामोरं जावं लागत आहे. वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांची कामं खोळंबत आहेत. याचाच अनुभव आज राज्याच्या मंत्रिमंडळालादेखील आला. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अडचण निर्माण झाली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वाची चर्चा सुरू होती. नेमकी याचवेळी लाईट गेली. त्यामुळे बैठकीचा खोळंबा झाला.
मुख्यमंत्री ठाकरे ओबीसी आरक्षणावर बोलत असताना मंत्रिमंडळ बैठक सुरू असलेल्या दालनातील वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे मुख्यमंत्री डिसकनेक्ट झाले. वीज पुरवठाच खंडित झाल्यानं मुख्यमंत्र्यांना आपलं म्हणणं पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षणावर सुरू असलेली चर्चा अर्धवट राहिली. वीज पुरवठा कोणत्या कारणामुळे खंडित झाला, ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.