मुंबईसह रिसरातील खंडित झालेला वीजपुरवठा अखेर सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:06 AM2021-05-21T04:06:25+5:302021-05-21T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : तौक्ते चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे मुंबई परिसराला वीजपुरवठा करणारी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव वाहिनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तौक्ते चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे मुंबई परिसराला वीजपुरवठा करणारी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव वाहिनी १८ मे रोजी बंद पडली होती. उपकेंद्रातील सुरक्षा प्रणालीनुसार बिघाड हा कळवा उपकेंद्रापासून ३८ किलोमीटर अंतरावर माथेरान येथील डोंगऱ्यादरम्यान होता. महापारेषणने युद्धपातळीवर कामाचे नियोजन करून वीजवाहिनी सुरू केली. शिवाय ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व राज्यातील इतर जिल्ह्यांतील वीजयंत्रणेचे नुकसान झाले. मात्र, आता खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
४०० के. व्ही. कळवा-पडघे या वाहिनीची अर्थवायर विद्युत तारावर पडून विद्युत वाहिनी बंद पडली. बिघाडाचे ठिकाण तळोजा रेल्वे क्रॉसिंगजवळ होते. तसेच चक्रीवादळामुळे झाडे पडल्याने रस्ते बंद होते. महापारेषणने रेल्वे विभागाशी संपर्क साधून भरपावसात अर्थ वायरचा अडथळा दूर केला. त्यामुळे ४०० के. व्ही. कळवा-पडघे ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली. २२० के. व्ही. टेमघर या उपकेंद्रात अतिवृष्टी व वादळामुळे विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. त्वरित कार्यवाही करून टेमघर वाहिनी व उपकेंद्राचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. पडघे, कळवा, कलरकेम, बोईसर, आपटा, उरण, कुडूस, डोंबिवली, वसई, ट्रॉम्बे, बोरिवली, नागोठाणे व इतर उपकेंद्राने कठीण परिस्थितीतही ऑक्सिजन कारखाने, कोविड केंद्रे यांना विद्युत पुरवठा अखंडित ठेवला.
हवेच्या तीव्र जोरामुळे २२० के. व्ही. बॉम्बे डाईंग-सहारा वाहिनीच्या मनोऱ्याच्या वरच्या टोकाला असलेली अर्थ वायर वाहिनीवर पडली. दोन मनोऱ्यादरम्यान मोठी नदी होती. या परिस्थितीतही मुसळधार पाऊस असताना महापारेषणने दुरुस्ती करून वाहिनी पूर्ववत केली. १०० के. व्ही. तळोजा येथून दोन वाहिन्या लिंडे ऑक्सिजन कारखान्यास वीजपुरवठा करतात. या दोन्ही वाहिन्या एकाचवेळी बंद पडून ऑक्सिजन कारखान्यास वीजपुरवठा खंडित झाला होता. संबंधित कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर ४५ मिनिटांत विद्युत पुरवठा पूर्ववत केला.