मुंबई : महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा केंद्रातील सर्किट - २ चा वीजपुरवठा बंद पडल्याने सोमवारी सकाळी १० वाजता मुंबईसह ठाणे, कल्याण व रायगड जिल्ह्यातील काही भागांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत होण्यास सोमवारी रात्रीचे साडेबारा वाजले. भांडुप आणि ठाणे परिसरात सोमवारी रात्री साडेबारा ते एक वाजता वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा, पडघा, खारघर ट्रान्सफॉर्मर वाहिनी बंद झाल्याने मुंबई व मुंबई उपनगरचा २२०० मेगावॅट वीजपुरवठा खंडित झाला. कळवा-खारघर येथील जंपर ब्रेकडाऊन झाला. सोमवारी दुपारी अडीच वाजता तो सुरू करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. रेल्वेचा वीजपुरवठा वेगाने सुरळीत केला.
महापारेषणने उपकेंद्रांतील बिघाड दुरुस्त केल्यानंतर, मुंबई व मुंबई उपनगरांसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा महावितरणकडून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. भांडुप परिमंडळातील सुमारे नऊ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी रात्रीपर्यंत सुरू करण्यात आला. उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठाही टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला. महापारेषणच्या म्हणण्यानुसार, रेल्वे व रुग्णालयांचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरू करण्यात आला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास बंद पडलेली मुंबई वीज प्रणालीही सुरू करण्यात आली.नेमके काय झाले होते?महापारेषणच्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक १ ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट- २ वर होता. मात्र, सर्किट - २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील काही भागांत वीजपुरवठा सोमवारी दिवसभर खंडित झाला.