गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअर, महाराष्ट्रात लोडशेडिंग; ५५ मिनिटांचा ‘पॉवर’ ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 06:43 IST2025-03-13T06:43:15+5:302025-03-13T06:43:46+5:30
मुंबई, ठाणे, पुण्यात हाल

गुजरातमध्ये ग्रीड फेल्युअर, महाराष्ट्रात लोडशेडिंग; ५५ मिनिटांचा ‘पॉवर’ ब्लॉक
मुंबई : तापमानात दिवसेंदवस वाढ होत असल्याने उष्णतेच्या लाटांनी मुंबई-महामुंबईसह राज्यभरातील नागरिक अक्षरशः भाजून निघत असताना बुधवारी दुपारी ३ वाजता अचानक बोरीवली, मालाड, मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ या भागांतील रहिवाशांना ५५ मिनिटांच्या वीज भारनियमनाचा त्रास सोसावा लागला.
नाशिक आणि पुण्यातही हीच स्थिती होती. वीज वाहून नेणाऱ्या पारेषण वाहिन्यांमध्ये (ग्रीड) गुजरातमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महाराष्ट्रातील या भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
विजेची मागणी ३१ हजार मेगावॉटवर पोहोचणार?
मंगळवारी मुंबईसह संपूर्ण राज्याची विजेची मागणी २९ हजार ७२८ मेगावॉट नोंदविण्यात आली. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे विजेची मागणी ३१ हजार मेगावॉटही नोंदविली जाऊ शकते, अशी शक्यता वीज अभ्यासकांनी वर्तविली आहे.
...तर बसला असता मोठा फटका
गुजरातमधील बिघाडामुळे राज्यभरात तीन ते चार हजार मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. भारनियमन केले नसते तर वीजबिघाडाचा मोठा फटका संपूर्ण राज्याला बसला असता, असे वीजपुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पारेषण वाहिन्यांमध्ये तांत्रिक अडथळा आला. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला. महाराष्ट्र पारेषण वाहिन्यांद्वारे गुजरातला जोडला गेला आहे. एखाद्या राज्यातील पारेषण वाहिन्यांत तांत्रिक अडथळा आला; आणि या वाहिन्या इतर राज्यांना जोडल्या गेल्या असतील त्याचा परिणाम संबंधित राज्यावरही होतो.
या घटनेचा परिणाम बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथील काही भागावर झाला. या सर्व ठिकाणी दुपारी ३:५५ नंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
गुजरातमध्ये वेस्टर्न ग्रीड फेल झाल्यामुळे पुणे, ठाणे आणि नाशिकमधील काही भागात भारनियमन करावे लागले. महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राने तातडीने पुढील धोका ओळखून ही परिस्थिती हाताळली - शशांक जेवळीकर, कार्यकारी संचालक, भार प्रेषण केंद्र
आम्ही मुंबई पॉवर सीस्टिमला हायड्रो आणि ट्रॉम्बे वीजनिर्मिती प्रकल्पांमधून सुमारे ५५० मेगावाॅट वीजनिर्मिती करून मदत केली. त्यामुळे गुजरातमध्ये झालेल्या गोंधळानंतर ग्रीडला आधार मिळाला - टाटा पॉवर