वीज कामगारांचे कामबंद आंदोलन तूर्त स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:49+5:302021-06-01T04:06:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ऊर्जा सचिव, तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या पातळीवर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वीज कामगारांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऊर्जा सचिव, तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या पातळीवर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वीज कामगारांनी साेमवारी कामबंद आंदाेलन स्थगित केले.
वीज कामगारांच्या मागण्या योग्य आहेत. महावितरण कंपनीकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा मिळावा व लसीकरण करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. वीज बिल वसुलीसाठी सक्ती करणार नाही. मात्र, वीज बिल वसुली झाली नाही, तर कंपनीची आर्थिक परिस्थिती अधिक खराब होईल. टीपीएबाबतचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यावा, असे सूचित केले आहे. शिल्लक कामगारांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशा अनेक मुद्यांवर ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांच्या पातळीवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे कामबंद आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वीज कामगार, अभियंते सघंटना संयुक्त कृती समितीने दिली.
वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा द्या, वीज कामगार व कुटुंबीयांचे लसीकरण करून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्या, मृत कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अनुदान द्या, तसेच मेडिक्लेम योजनेत नेमलेला नवीन टीपीए रद्द करा, इत्यादी मागण्यांसाठी २४ मेपासून वीज कामगार, अभियंते संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामबंद आंदाेलन सुरू करण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या तीन तासांच्या सकारात्मक चर्चेनंतर व लेखी स्वरूपात सरकार व व्यवस्थापनाकडून कार्यवृत्त देण्यात येणार असल्यामुळे कामबंद आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. लवकरच सकारात्मक तोडगा निघाला नाही तर सामुदायिक रजा आंदोलन करणार असल्याचा इशारा वीज कामगार नेते कृष्णा भोयर यांनी दिला आहे.
..............................