मुंबई : भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितात यत्किचिंतही आस्था नसलेला पक्ष आहे. आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्रे आहेत. राजकारणातील चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन बसवतात. पण सामान्यांनी एकदा ठरविल्यानंतर वरच्या स्थानावर कितीही शक्तिशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर शरसंधान केले.
शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या आठवड्यातील उत्तर प्रदेशमधील चित्र पाहिले तर १५ दिवसांपूर्वी भाजपचे नेते सांगत होते, उत्तर प्रदेशमध्ये कुणी बघायचेच कारण नाही. पण आज एक दिवस असा जात नाही, जेव्हा भाजपमधील लोक पक्ष सोडून जात आहेत. यात मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे.
१४ जानेवारी हा दिवस माझ्या अंत:करणात कायमचा राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता. त्याच्या पूर्वसंध्येला आज अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे, असे पवार म्हणाले. परभणी येथील माजी आमदार विजय गव्हाणे, वर्धातील मनसेचे नेते अतुल वांदिले, पुणे येथील आरपीआयचे नेते प्रदीप साठे, श्रध्दा साठे, नांदेड येथील बाळासाहेब जाधव, डॉ. सोनकांबळे, पैठणमधील किशोर दसपुते आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नवाब मलिक आदी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडेंनी सलोखा सोडला नाही
परभणी जिल्ह्याचा राजकीय इतिहास आणि विजय गव्हाणे यांच्याबद्दल पवार म्हणाले की, गव्हाणे हे दोस्तीला पक्के आहेत. त्यामुळेच ते त्यांचे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. गोपीनाथ राजकारणात आमचे विरोधक असले तरी त्यांनी व्यक्तिगत सलोखा कधी सोडला नाही. त्यांचा स्वभाव गव्हाणे यांना भावल्यामुळेच ते भाजपमध्ये गेले.