शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 07:44 PM2020-01-10T19:44:11+5:302020-01-10T19:46:23+5:30

Protest Against CAA and NRC : रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असून सर्व राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. 

'Powerful' rally in Mumbai against CAA and NRC lead by NCP Sharad Pawar | शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली

शरद पवारांच्या नेतृत्वात CAA अन् NRC विरोधात मुंबईत 'पॉवरफुल्ल' रॅली

googlenewsNext

मुंबई: नागरिकत्त्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्ट, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना एकवटल्या असून येत्या २४ जानेवारीला दुपारी दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर विशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार करणार असून सर्व राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रित करण्यात येणार आहे. 

मुंबईत आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, लोक भारती, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर, बीआरएसपी, राष्ट्र सेवा दल, भटके विमुक्त समाज, कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे निमंत्रक आमदार कपिल पाटील आणि आमदार किरण पावसकर यांनी ही माहिती दिली.

केंद्र सरकारच्या या नव्या कायद्याने आदिवासी, भटके विमुक्त, लिंगायत आणि मुस्लिम यांच्यासह धर्म नसलेलेही बाधित होणार आहेत. देशातील ३० टक्क्यांहून अधिक समाजाला नोटबंदी पेक्षा अधिक मोठ्या जाचाला सामोरं जावं लागणार आहे. हा प्रश्न कोणत्या जाती समुहांचा नसून भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाईला सज्ज व्हावे असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले. कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता देशाचा तिरंगा हातात घेऊन 'हम भारत के लोग' या नावानेच हे आंदोलन सुरू ठेवण्यास राजकीय पक्षांनी संमती दिली. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने अलीकडेच देशभरातील विचारवंत व अ‍ॅक्टिव्हीस्ट एकत्र आले होते. त्यावेळी 'हम भारत के लोग' या नावाने हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय झाला होता.

आज झालेल्या बैठकीत लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार किरण पावसकर, काँग्रेस पार्टीचे एकनाथ गायकवाड व सचिन सावंत, समाजवादी पार्टीचे मिराज सिद्दीकी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त व अंजुमने इस्लामचे चेअरमन डॉ. जहीर काझी, बीआरएसपीचे सुरेश माने, सीपीएमचे डॉ. अशोक ढवळे, जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, मलविंदसिंग खुराणा, सीटीझन्स फोरम अगेन्स्ट एनआरसी, एनपीआरचे फारूक शेख, भटके विमुक्त समाज नेते डॉ. कैलास गौड, छात्र भारतीचे सचिन बनसोडे उपस्थित होते.

Web Title: 'Powerful' rally in Mumbai against CAA and NRC lead by NCP Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.