पनवेल : डीआयजी निशिकांत मोरे यांच्या प्रकरणातील पीडित मुलीसोबत सापडलेल्या २० वर्षीय अंकित सिंग या तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून पनवेल न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
६ जानेवारीला ही तरुणी घरातून रात्री ११.३० वाजता आत्महत्या करण्यासाठी बाहेर पडली होती. ती ज्या दिवशी बेपत्ता झाली होती, त्याच दिवशी अंकित बेपत्ता झाला होता. खारघर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोघांनी बेपत्ता झाल्यापासून आपले फोन बंद ठेवले होते. १०० पोलिसांचे पथक दोघांना शोधण्यासाठी नवी मुंबईवरून उत्तर प्रदेश येथे रवाना झाले होते. दोघेही जण खारघर रेल्वे स्थानकावरून कुर्ला रेल्वे स्थानकात पोहोचल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर दोघेही अलाहाबाद येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या दरम्यान पीडित मुलीचा संपर्क कुटुंबीयांसोबत झाला नव्हता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. दरम्यान, डेहरादूनवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. आत्महत्येचा बनाव करीत घरातून बाहेर पडत तरुणीने संपूर्ण पोलीस यंत्रणेला हाताशी धरून खोटी नोट लिहिल्याचे यामुळे उघड झाले आहे. अंकित सिंग हा तरुण पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या ओळखीचा आहे. हा तरुण काही महिने या कुटुंबीयांकडे कामालाही होता.डीआयजी मोरे फरारचसंपूर्ण यंत्रणा कामाला लावून मुलीचा शोध लावणाऱ्या नवी मुंबई पोलिसांच्या हाती अद्याप डीआयजी मोरे लागले नाहीत. सत्र न्यायालयाने मोरे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी डीआयजी मोरेंचे प्रयत्न सुरू आहेत. डीआयजी मोरे अद्याप फरार असून लवकरच त्यांना अटक करू, अशी माहिती उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.