जत्रोत्सवात रंगली अवघी प्रभादेवी! परंपरेची जपणूक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 07:02 AM2018-01-05T07:02:23+5:302018-01-05T07:03:29+5:30

तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी आणि परंपरा काळाच्या ओघात हळूहळू अस्तंगत होत चालल्या आहेत. एकेकाळी मुंबापुरीत होणारे विविध देवस्थानांचे जत्रोत्सव भूतकाळाच्या पानांत गायब झाले आहेत. अशा अनेक जत्रोत्सवांवर कायमचा पडदा पडला असला, तरी प्रभादेवीची जत्रा मात्र आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.

 Prabhadevi is celebrated with Jatotsav The charm of the tradition | जत्रोत्सवात रंगली अवघी प्रभादेवी! परंपरेची जपणूक  

जत्रोत्सवात रंगली अवघी प्रभादेवी! परंपरेची जपणूक  

Next

मुंबई  - तत्कालीन मुंबई बेटावरच्या रूढी आणि परंपरा काळाच्या ओघात हळूहळू अस्तंगत होत चालल्या आहेत. एकेकाळी मुंबापुरीत होणारे विविध देवस्थानांचे जत्रोत्सव भूतकाळाच्या पानांत गायब झाले आहेत. अशा अनेक जत्रोत्सवांवर कायमचा पडदा पडला असला, तरी प्रभादेवीची जत्रा मात्र आजही आपले अस्तित्व टिकवून आहे. हीच परंपरा जपत प्रभादेवी मंदिराच्या परिसरात ही जत्रा सध्या भरली आहे. या जत्रोत्सवात अवघी प्रभादेवी रंगली आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या जत्रेला प्रारंभ झाला असून, १० जानेवारीपर्यंत हा जत्रोत्सव सुरू राहणार आहे.
ज्या देवीच्या नावावरून प्रभादेवी परिसराला ‘प्रभादेवी’ हे नाव पडले, त्या ‘प्रभावती’ देवीच्या उत्सवाने सध्या इथे रंग भरला आहे. यानिमित्ताने उत्साही मुंबापुरीचा जुना चेहरा पुन्हा एकदा उजळला आहे. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या न्यू प्रभादेवी मार्गावर प्रभादेवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिरात प्रसन्नवदने अशा प्रभावती देवीसह चंडिका व कालिकादेवीचेही स्थान आहे. साहजिकच, या तिन्ही शक्तींचे एकत्रित दर्शन घेण्याची पर्वणी येथे भाविकांना लाभते. या मंदिरात स्थानापन्न असलेली प्रभावती देवी ही समाजातील अनेक
ज्ञातींची कुलदेवता आहे आणि त्यामुळे भाविकांची येथे दाटी झालेली दिसते.
सध्या उत्सवाच्या काळात प्रभादेवी मंदिराचे आवार आणि लगतच्या परिसरात मिठाई, फुले, प्रसाद, खेळणी, खाद्यपदार्थ तसेच विविध प्रकारच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. या जत्रेची खासियत असलेला खाजा, पेठा, हलवा, चिक्की आदी जिन्नसांच्या दुकानांवर भाविकांची गर्दी दिसून येत आहे. जत्रेतली ही दुकाने दुपारनंतर उघडतात आणि मग रात्रीपर्यंत हा परिसर पूर्णत: ‘जत्रा’मय झालेला दिसतो.

इतिहास व शिलालेख... : प्रभावती देवी ही ज्याची कुलस्वामिनी होती, तो राजा बिंब १२ व्या शतकात त्या वेळच्या मुंबई बेटावर राज्य करीत होता. त्या काळात मुंबापुरीवर परकीय आक्रमणे होत असत. त्यामुळे या देवीची मूर्ती प्रथम माहीमची खाडी व नंतर प्रभादेवी परिसरातील विहिरीत लपविण्यात आली होती. सन १७१४ मध्ये
पाठारे प्रभू ज्ञातीतील श्याम नायक यांनी ही मूर्ती विहिरीतून बाहेर
काढून मंदिर उभारले. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या इतिहासाची नोंद मंदिरात असलेल्या शिलालेखावर आजही दिसून येते.

Web Title:  Prabhadevi is celebrated with Jatotsav The charm of the tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या